सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून एक मेपासून तिसरा टप्पा सुरू झाला आहे. याअंतर्गत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी सोमवारपासून ११ ठिकाणी लसीकरण सत्र होणार असून त्याची केंद्रही निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती देण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील कोमोर्बिड व्यक्ती यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लस मोहीम सुरू झाली. आता तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले असलेतरी याला अडथळे जादा आहेत.
सातारा जिल्ह्यात सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ५ केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू होते. आता १० मेपासून जिल्ह्यातील ११ ठिकाणी लसीकरण सत्र सुरू होणार आहे. यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सातारा येथे जिल्हा शासकीय रुग्णालय, कराड व फलटणला उपजिल्हा रुग्णालय. त्याचबरोबर कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर, दहिवडी, मेढा, वाई येथील ग्रामीण रुग्णालयात तर खटाव आणि शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हे लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
.........................................................................