वाई : कोरोनाचा कहर वाढला असून, अनेक रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडीसिवीर इन्जेक्शनची कमतरता जाणवत असून, उपलब्ध रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करणे सामान्य माणसाला आर्थिक अडचणीमुळे कठीण झाले आहे. १५ मार्चनंतर राज्यासह देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट असून, परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी परिस्थिती आहे.
देशातील गतीने कोरोना संसर्ग होणाऱ्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील असल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे तसेच राज्यात काही जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच विषाणूचा नवीन आलेला ट्रेंड यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
वाई तालुक्यात एप्रिलमध्ये ६४६ रुग्ण सापडले असून, अलीकडच्या काही दिवसात ८० ते शंभरच्या दरम्यान रुग्ण सापडत आहेत. मार्च महिन्यात ४३८ रुग्ण सापडले होते. ही प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ एप्रिल महात्मा फुले ते १४ एप्रिल आंबेडकर जयंती असे टिकाकरण उत्सव जाहीर केल्याने रविवारी वाईमध्ये हा टिकाकरण उत्सव सुरू झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अभियान चालू केले आहे. प्रशासनाकडून फिरत्या पथकाद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह व्यावसायिक करीत आहेत.
तरी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्य अनिल सावंत, वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.
कोट
कोरोनात प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक
सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, व्यावसायिक, नागरिकांनी सावधगिरी बाळगून स्वतः गाफील न राहता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन केले पाहिजे. लग्नसमारंभ, बाजारात नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरण मोहीम चालू असून, प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.
उदयकुमार कुसूरकर,
गटविकास अधिकारी, वाई पंचायत समिती