लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात एकीकडे लसीकरणाचा वेग मंदावला असताना दुसरीकडे मात्र कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केवळ कोरोना चाचणीवर भर दिलाय. सर्व जबाबदारी नागरिकांवर सोपवली असून, आमच्यापरीने आम्ही प्रयत्न करतोय, असं प्रशासन सांगत आलंय. त्यामुळेच सातारा जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरण्याऐवजी वाढतच चाललीय.
जिल्ह्यात दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरूवातीला ४४३ लसीकरण केंद्र सुरू केली होती. परंतु, लसीचा पुरवठा होत नसल्याने महिनाभरातच यातील तब्बल ४२२ केंद्र बंद पडली. त्यामुळे केवळ २१ लसीकरण केंद्रच सध्या सुरू आहेत. लसीकरणाचा वेग आता पूर्णपणे मंदावलाय. लसीचा पुरवठा अल्प प्रमाणात होऊ लागलाय. दिवसाला कधी ४ तर कधी २ असे लसीकरण होऊ लागलेय. त्यामुळे प्रशासनाने जास्तीत जास्त कोरोना चाचणी करण्यावर भर दिलाय. दिवसाला १२ हजार लोकांची कोरोना चाचणी केली जातेय. यातून ९०० ते १००० हजार रुग्ण बाधित आढळून येत आहेत. मध्यंतरी बाधितांची संख्या कमी झाली होती. बाधितांचा आकडा पाचशेच्या घरात आला होता. परंतु, आता एक हजाराने आकडा वाढलाय, ही बाब सातारा जिल्ह्यासाठी अत्यंत चिंताजनक मानली जातेय.
चाैकट : दुसरी लाट न ओसरण्याची कारणे
संस्थात्मक विलगीकरण सुरू असताना बहुतांश रुग्ण गृह अलगीकरणात
प्रशासनाकडून काॅन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्णपणे बंद
परजिल्हा व राज्यातून येणाऱ्यांवर कोणतेही बंधन नाही
प्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजनांचा अभाव
गृहभेटीद्वारे रुग्णांची नोंद घेणारे सर्वेक्षण बंद
बाजारपेठेतील गर्दी वाढली
फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर कमी
...........................................................................................
चाैकट : काय करायला पाहिजे होते.
गृह अलगीकरण शंभर टक्के बंद करायला हवे होते.
मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करणे गरजेचे होते.
घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेतली पाहिजे होती.
कोरोना चाचण्या आणि बेडची संख्या वाढवायला हवी होती.
बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण आणायला हवे होते.
....................................................................................
सातारा जिल्ह्याची लोकसंख्या - ३१,५०,०००
एकूण कोरोनाबाधित रुग्ण - २,०६,१६६
मृत्यू - ४,९६६
कोरोनामुक्त - १,९१,८३९
सध्या उपचारार्थ रुग्ण : १०,०८६
...........................................................
लसीकरण :
जिल्ह्याला उपलब्ध झालेले एकूण डोस - १०,६६,०३२
पहिला डोस - ८,३०,५८७ टक्केवारी : ३८ टक्के
दोन्ही डोस घेतलेले - २,३५,४४५ टक्केवारी : ११ टक्के
पुरुष - ५,५७,२२८
महिला - ५,०८,७०६
इतर - ९८
कोविशिल्ड- ९,४८,०४९
कोव्हॅक्सिन - १,१६,०५३
स्पुतनिक - १,९३०
लसीकरण केंद्र :
शासकीय केंद्र - १५
खासगी - ६