आदर्की : फलटण पश्चिम भागात तरडगाव व बिबी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कोरोना लसीकरण मोहीम राबविताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने अनेक गावे लसीकरणापासून दूर असल्याने लसीकरणाचे वशिलीकरण होत असल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण पश्चिम भागातील गावांतील लोकांचे तरडगाव व बिबी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत लसीकरण करण्यात येते. प्रारंभी आरोग्य केंद्र परिसरात लसीकरण करण्यात येत होते. परंतु कोरोना चाचणी व लसीकरण एकाच ठिकाणी होत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक उपकेंद्रात लसीकरण होऊ लागले. त्या ठिकाणी लस कमी अन् रुग्ण जास्त होऊ लागल्याने गावोगावी लसीकरण होऊ लागले अन् गाव नेते झोपेतून जागे झाले. लसीकरणाच्या ठिकाणी टेबल टाकून बसू लागले. लसीकरणाच्या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप करून गोरगरिबांना बाजुला ठेवून गाव नेतेमंडळी आपल्या नातेवाईकांना लस देण्यासाठी पुढे सरसावले. लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला पहाटेपासून रांगेत बसून राहतात. पण, त्यांना लस मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
सर्वसामान्य पहिल्यापासून डोसपासून वंचित आहेत, तर काहीजण दुसऱ्या लसीकरणासाठी फोनाफोनी करून गावोगावी फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे गावोगावच्या लसीकरणाची नाव, वार, यादी मागवून घेण्याची मागणी होत आहे.
(चौकट )
ग्रामीण भागात कोरोना लसीकरणात राजकारण होत असल्याने सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक लसीपासून वंचित राहात आहेत. राजकारणी बुथच्या बाहेर लस संपल्याचे सांगतात. नंतर फोनवरून नातेवाईकांना बोलावून लसीकरण केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
(कोट..)
रोटेशनप्रमाणे लसीकरण सुरू आहे. आता दुसरी लस घेणाऱ्यास प्राधान्य दिले जात असल्याने काही गावांत लसीकरण कमी झाल्याचे दिसत आहे. काही गावांनी बिबी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन लसीकरण केल्याने काही गावांत लसीकरण जास्त झाल्याचे दिसत आहे.
-डॉ. संदीप खताळ, वैद्यकीय अधिकारी, बिबी, ता. फलटण
कोट...
मुळीकवाडी येथे फक्त एकच वेळ कोरोना लसीकरण झाले असून, ज्येष्ठ नागरिक लसीपासून वंचित आहेत. काही ठिकाणी महिन्यातून दोनवेळा लसीकरण होते, तर मुळीकवाडीत फक्त एकदाच लसीकरण झाले आहे, तरी दुजाभाव करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.
-लहुराज मोहिते, ग्रामपंचायत सदस्य
फोटो : सासवड, ता. फलटण येथे लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. (छाया: सूर्यकांत निंबाळकर)