सातारा : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू झाले असलेतरी अजूनही मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे सर्वच गटातील लसीकरणाची सुरुवात अडखळतच सुरू आहे. त्यातच गेल्या सहा दिवसांत जिल्ह्याला एकदाच लस मिळाली आहे. त्यामुळे शिल्लक साठ्यावरच रोटेशनप्रमाणे काही केंद्रातच अंशत: लसीकरण सुरू आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयात ही सुविधा सुरू झाली. तर शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे.
आता एक मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाला आहे. अगोदरच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातच नवीन समस्या निर्माण होत आहे. कारण, जिल्ह्यात सध्या साडेनऊ लाखांवर ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी असून १८ ते ४४ वयोगटातील जवळपास ११ लाखांहून अधिक आहेत.
जिल्ह्याला लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यात ४४० हून केंद्रांत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्याला लस मिळण्याचे प्रमाण कमी आहे. मागील सहा दिवसांत तर एकदाच लस मिळालेली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला खीळ बसली आहे. काही केंद्रात अपुरा साठा आहे. त्यामुळे लसीसाठी येणाऱ्या नागरिकांना हेलपाटा बसत आहे. याचा विचार करून लसीचा पुरेसा साठा द्यावा, अशी मागणी होत आहे.
पॉईंटर :
- जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेले कोरोना डोस ६४८०५०
- लसीकरण झाले ६१८६२२
- प्रथम डोस ५३४८६९
- दुसरा डोस ८३७५३
..................
चौकट :
१८ वर्षांवरील लसीकरण ४ हजार
जिल्ह्यात १ मे पासून प्रायोगिक तत्त्वावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. त्यासाठी ५ केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण सुरू झालेले आहे. सातारा जिल्हा रुग्णालय, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालय, शिरवळ, महाबळेश्वर आणि खटाव येथील केंद्रात हे लसीकरण सुरू आहे. या ठिकाणी आतापर्यंत ४२८४ जणांना लस देण्यात आली आहे.
......................................................