अन् लसीकरणाला बसतोय खोडा
लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात सुरुवातीला लसीकरणाला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, कोरोनाची भीषणता लक्षात आल्यानंतर लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी होऊ लागली. मात्र लसीचा वारंवार तुटवडा होत असल्याने लसीकरणाला खोडा बसत आहे. गत पाच महिन्यांत सातारा शहरात केवळ ६९ हजार ७३५ जणांनी लसीकरण केले आहे. म्हणजे ३२ टक्केच लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यात २३ जानेवारीला लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला. या वेळी नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नव्हता. लसीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था आणि गैरसमजही होते. त्यामुळे सुरुवातीला दिवसाला दोनशे ते तीनशे लसीकरण होत होते. मात्र, दुसऱ्या लाटेत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर नागरिक हादरून गेले. लसीकरणशिवाय पर्याय नाही, हे नागरिकांना कळून चुकले. तेव्हा लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी होउ लागली. सातारा शहरामध्ये केवळ तीन लसीकरण केंद्र आहेत. यामध्ये पहिल्या दिवसापासून गर्दी होत आहे. पहाटे चार वाजता अनेकजण लसीकरण केंद्रावर येऊन रांगा लावत होते. भर उन्हातही लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत होता. मात्र, लसीचा वारंवार तुटवडा होत असल्यामुळे अनेकदा नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते. सध्याही हीच परिस्थिती आहे. शहरातील शेवटच्या टोकावर राहणारे नागरिकही लसीसाठी धडपड करत आहेत. कितीही दूरवरील केंद्रावर जातो, पण लस द्या, अशी मागणी होत आहे.
लसीकरण कमी होण्याची कारणे
वारंवार होणारा लसीचा तुटवडा हे लसीकरण कमी होण्याचे मुख्य कारण आहे. शहराची लोकसंख्या २ लाख २५ हजार इतकी आहे. असे असताना लसीकरणाचा वेग जर वाढला नाही तर अजून एक वर्ष लस घेण्यासाठी या सर्वांना लागतील. लसीकरणाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, वारंवार लसीचा तुटवडा होत असल्यामुळे लसीकरणाला अडथळा निर्माण होत आहे. शासनाकडून लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यास लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविता येईल.
अभिजित बापट- मुख्याधिकारी, सातारा पालिका
मोफत लसीकरणावर अनेकांचा भर...
सातारा शहरात तीन लसीकरण केंद्रे असून, या केंद्रांवर मोफत लसीकरण केले जाते. त्यामुळे अनेकांचा मोफत लस घेण्याकडेच ओढा आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय, गाडोली आणि कस्तुरबा रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे. या तिन्ही केंद्रांवर ६९ हजार ७३५ इतके लसीकरण झाले आहे.
सर्वाधिक लसीकरण सिव्हिलमध्ये झाले असून, ३१ हजार ४८ इतके आहे. तर कस्तुरबामध्ये १३ हजार ८८९ इतके झाले आहे.
साताऱ्यातील गाडोली केंद्रावर १४ हजार ७९८ जणांनी लसीकरण केले आहे. मात्र, लसीचा तुटवडा होत असल्याने लसीकरणाला वारंवार व्यत्यय येतोय.