कुकुडवाड : माण तालुक्यातील वडजल व भाकरेवाडी या दोन्ही गावांच्या हद्दीतून उरमोडी योजनेच्या कॅनॉलचे काम जोरात सुरू आहे. मात्र हा कॅनॉल पूर्वी केलेल्या सर्व्हेनुसार खोदत असताना अचानक तो वडजल गावचे ग्रामदैवत वडजाईदेवीच्या इनामी जमिनीतून खोदण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्याने लोकांनी कामाच्या ठिकाणी जाऊन सुरू असलेले काम बंद पाडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.माण तालुक्याला वरदान ठरणाऱ्या उरमोडी योजनेच्या कॅनॉलचे काम सुरू आहे. हे काम काही दिवसांपासून वडजल परिसरात सुरू आहे. सध्या हे काम भाकरेवाडीच्या हद्दीत सुरू होते. सुरुवातीला हे काम जोतिबाच्या मंदिराजवळून समोर असलेल्या वीजवितरणच्या डीपीसमोरून पूर्वीच्या सर्र्व्हेनुसार खुदाई सुरू होती.
मात्र भाकरेवाडीच्या लोकांनी काही क्षणात सूत्रे फिरवून कॅनॉलची दिशाच बदलून हे काम वडजल गावचे ग्रामदैवत व हजारो भाविक, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वडजाईदेवीच्या इनामी जमिनीतून संबंधित ठेकेदाराने सुरू केले. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी या कामाची पूर्णपणे चौकशी करून यामधील दोषींवर कडक कारवाई करावी. जर हे काम धडपशाही करून सुरू केले तर लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.