वडूज : कोरोना महामारीत वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी संपूर्ण शहर बंद करण्याचा निर्णय वडूज नगरपंचायत प्रशासनाने घेतला असून, यामध्ये फक्त शासकीय कार्यालये, मेडिकल्स व दवाखाने वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले होते. पुकारलेल्या जनता कर्फ्यूला वडूजकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रशासनाचा अतिरिक्त ताण कमी जाणवला.
दिवसेंदिवस वडूज शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने कडक निर्बंध घालून शहर पूर्णतः बंद करणे अत्यावश्यक असल्याचे लक्षात येताच, हा जनता कर्फ्यू पुकारला. वडूजकरांनीही यास दाद देत घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे चौका-चौकातील नेहमीच वर्दळीत असणारे रस्ते सुनसान वाटू लागले. या काळात घरपोच दूध सेवा सुरू होती, तर अन्य इतर सर्व दुकाने कुलूपबंद राहिली. पंचवीस हजार लोकवस्ती असलेले वडूज शहर आणि तालुक्याचे मुख्यालय असल्याने येणाऱ्यांची वर्दळ लक्षणीय असते. याचा वाढता धोका लक्षात घेऊन किराणा मालासह भाजीपाला व राष्ट्रीयीकृत बँकांसह पतसंस्थाही पूर्ण क्षमतेने बंद ठेवणे नगरपंचायत प्रशासनाला सहजशक्य झाले. या काळात कोणी नियमाचे उल्लंघन केले तर नगरपंचायत प्रशासनाकडून कठोर कारवाई करणेत येईल, अशा आदी सूचनाही जारी करण्यात आल्याने आणि पोलीस प्रशासन अलर्ट राहिल्यामुळे विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरकले नाही.
चौकट..
‘ब्रेक द चेन’चा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल..!
नागरिकांच्या हितासाठी आणि या आरोग्य संसर्ग आजारापासून बाधितांची संख्या थांबविण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने हा जनता कर्फ्यूचा घेतलेला निर्णय ‘ब्रेक दि चेन’चा घेतलेला निर्णय साखळी तोडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावेल, हे निश्चित आहे. या काळात नागरिकांनी व दुकानदारांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, अशाप्रकारे सूचनाही पोलीस प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. या जनता कर्फ्यू कालावधीत प्रशासकीय यंत्रणेस काहीकाळ उसंत मिळणार असून, पुढील काळातील संभाव्य धोके लक्षात घेऊन आराखडा तयार करून वडूजकरांना दिलासा द्यावा, अशा आशयाचे मत काही सूज्ञ जाणकार नागरिकांतून व्यक्त होत आहे.
२३वडूज
फोटो :
नगरपंचायतीच्यावतीने पुकारलेल्या लाॅकडाऊनला वडूजकरांनी शहरात न फिरता घरीच बसणे पसंत केले. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता.
(छाया : शेखर जाधव )
----------------------