पेट्री : शहराच्या पश्चिमेस गेले चार-पाच दिवस सतत पडणाऱ्या धुवाधार पावसाने भांबवली (ता. सातारा) गावात प्रचंड नुकसान झाले आहे. गावात काही ठिकाणची भातशेती वाहून गेली आहे. कित्येक शेतांचे बांध पडले आहेत. बांधासहितच भातशेती वाहून गेल्याचे चित्र आहे. घरांचे पत्रे उडून झाडांवर बसले आहेत. धुवाधार पाऊस, सोसाट्याचा वारा त्यामुळे भीतीदायक परिस्थिती निर्माण होऊन गावकरी घराबाहेर पडायला घाबरत असून न भूतो न भविष्यती असे प्रलयकारी पावसाचे रूप पाहावयास मिळत असून गुरांचे देखील अतोनात हाल होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कास परिसरात ठिकठिकाणच्या ओढ्यांना नदीचे रूप आल्याने गावागावांतील संपर्क तुटला आहे. गावातील वयस्कर ग्रामस्थ सांगतात की, असा प्रलयकारी पाऊस उभ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. सगळीकडेच पावसाने थैमान घातले असून, प्रचंड आर्थिक तसेच शेतीचे नुकसान केले आहे.
मागील महिन्यात कास तलाव ओव्हरफ्लो होऊन सध्याच्या सततच्या मुसळधार पावसामुळे तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असून, देशातला एक नंबरचा भांबवली वजराई धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत आहे. प्रचंड पाण्याचा प्रपात डोळ्याचे पारणे फेडत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे पर्यटन बंद आहे. भातशेती केली होती ती देखील पावसात वाहून गेली आहे. शेतीचे बांध वाहून गेले आहेत. घरांचे नुकसान झाले आहे. पत्रे उडून गेले असून, भागातील ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
(कोट)
भागात मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात पर्यटनबंदीमुळे आवक थांबली आहे. उदरनिर्वाह कसा करायचा अशी चिंता ग्रामस्थांना लागली आहे. शासनाने भांबवली गावचा सर्व्हे करून मदतीचा हात द्यावा, अशी रास्त अपेक्षा भांबवली ग्रामस्थांची आहे.
-रवींद्र मोरे, पर्यटन प्रमुख,सह्याद्री पठार विभाग विकास संघ
फोटो आहे..
२३पेट्री भांबवली
पश्चिमेकडील भागात मुसळधार पाऊस पडत असून, भांबवली, ता. सातारा येथे भातशेती बांधासहित वाहिली आहे, तसेच घराचे पत्रेदेखील उडून गेल्याचे चित्र आहे.
(छाया : सागर चव्हाण)