वाई : सध्या कोरोनाचे वैश्विक संकट संपूर्ण जगात वाढत आहे. राज्यात कोरोनाची लाट आली असून, खबरदारी म्हणून राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घालून शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊन लागू केले आहे.
कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे महत्त्वाचे आहे. यासाठी नियमित योगा, व्यायाम, उत्तम आहार, शासनाने घालून दिलेले कोरोना नियम यामध्ये स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग राखणे, वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आदी काळजी घेणे गरजेचे आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेकजण योगा, व्यायामाकडे वळताना दिसत आहेत. वाई शहराच्या चोहोबाजूने असणाऱ्या रोडवर मॉर्निंग, इव्हिनिंग वॉक योगा प्राणायाम करताना नागरिक दिसतात. यामुळे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकार शक्ती वाढून सध्याच्या नैराश्येच्या वातावरणात सकारात्मक दृष्टिकोन वाढण्यास मदत होत आहे.
अशाप्रकारे सोनजाई डोंगराच्या पायथ्याशी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून योगा प्राणायाम करताना नागरिक दिसत आहेत.
यावेळी बोलताना योगशिक्षक दत्तात्रय डेरे म्हणाले, ‘निरोगी जीवन व्यतित करण्यासाठी नियमित योगा प्राणायाम करणे काळाची गरज आहे. भारतात योग संस्कृती ही फार पूर्वीपासून चालत आली असून, योग संस्कृती ही भारताने जगाला दिलेली देन आहे.
यावेळी जगदीश जगदाळे, मीना डेरे, शिल्पा जगदाळे आदी उपस्थित होते.
(चौकट)
योगामुळे सकारात्मकता वाढीस मदत
कोरोनाचे वाढते संकट, लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक, शेतकरी यांचे होणारे आर्थिक नुकसान यामुळे नैराश्य येऊ शकते. योगा-प्राणायाम, नियमित व्यायाम केल्यास नैराश्य जाऊन विचारात सकारात्मकता येते.
- संतोष शिंदे, योगशिक्षक