वाई : गीत रामायणकार ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. त्यामुळे या तिघांनाही आदरांजली वाहण्यासाठी राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने ‘त्रिवेणी साहित्य संगम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन ९ व १० फेब्रुवारीला केले आहे,’ अशी माहिती देण्यात आली.
वाई येथील द्रविड हायस्कूलमध्ये हा दोन दिवसीय कार्यक्रम होणार असून, ९ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात मराठी विश्वकोशच्या ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, कुमार विश्वकोश खंड २ भाग ३ चे संकेतस्थळावर लोकार्पण आणि मराठी विश्वकोशाच्या सूचिखंडाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर ‘ग. दि. माडगुळकर यांची प्रतिभासृष्टी’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यामध्ये अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक राजदत्त, गदिमांच्या साहित्याच्या इंग्रजी भाषांतरकार विनया बापट, साहित्यिक प्रा. डॉ. सिसिलिया कार्व्हालो आदी सहभागी होणार आहेत.
‘बहर गीतांचा व कवितांचा’ या कार्यक्रमातून कवी अरुण म्हात्रे, महेश केळुसकर व अशोक नायगावकर हे गदिमा आणि बाबूजींच्या रचनांचे तसेच आधुनिक कवितांचे भावविश्व गप्पांमधून उलगडणार आहेत. तर यानंतर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे ‘गीतरामायणाचा महाराष्ट्रावर झालेला सांस्कृतिक परिणाम’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.गायक जितेंद्र अभ्यंकर, सावनी दातार, हृषीकेश बडवे, श्रृती देवस्थळी यांची ‘प्रतिभा संगम’ ही विशेष गायन मैफील होईल. दि. १० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी ‘पु. ल. देशपांडे... या सम हा’ या कार्यक्रमातून पुलंचा जीवन आणि लेखनप्रवास मांडणार आहेत.
यानंतर पुलंच्या प्रकाशित व अप्रकाशित साहित्याचे अभिवाचन होणार असून, या कार्यक्रमात अभिनेते राहुल सोलापूरकर, गिरीश ओक व योगेश सोमण सहभागी होणार आहेत. यानंतर पु. ल. देशपांडे यांचे ‘साहित्यिक व सामाजिक योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात सिनेसमीक्षक व ‘भाई’ चित्रपटाचे पटकथालेखक गणेश मतकरी, अभिनेत्री, गायिका फैय्याज शेख, ज्येष्ठ सांस्कृतिक समीक्षक दिनकर गांगल, साहित्यिका मंगला गोडबोले आदी सहभागी होणार आहेत. या कलावंतांचा परिचय ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त व अभिनेते मोहन आगाशे हे अनुभव कथन करतील.