पेट्री : शहराच्या पश्चिमेस सतत मुसळधार पावसामुळे भारतातील सर्वाधिक उंचीचा भांबवली येथील वजराई धबधबा मोठ्या प्रमाणावर कोसळतानाचे चित्र असून, धबधब्याचे सौंदर्य मन भारावून टाकत आहे.सर्वांत उंचावरून तीन टप्प्यांत फेसाळणारा धबधबा अशी जगभर ओळख निर्माण झालेल्या भांबवली वजराई पांढऱ्या शुभ्र पाण्याचे विलोभनीय दृश्य अनुभवास मिळत असल्याने पर्यटकांच्या नजरेचे पारणे फिटत आहे. घनदाट जंगलातून पायवाट, हिरवेगार डोंगर, छोटे-मोठे धबधबे, अधूनमधून पावसाच्या सरी, सोबत धुक्याची दुलई अनुभवास मिळत असल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित होताना पाहायला मिळत आहे.पर्यटकांना राहण्यासाठी चार टेंट उपलब्ध असून बांबू कुटीचे काम सुरू आहे. जुलै महिन्यात वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समिती भांबवली यांच्याकडून धबधब्याच्या पर्यटनास प्रारंभ करण्यात येईल; तसेच प्रतिमाणसी तीस रुपये पर्यटन शुल्क आकारण्यात येईल, अशी माहिती वनविभागाद्वारे देण्यात आली.
भांबवली येथील वजराई धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण असून पर्यटकांनी धबधब्यासह निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद लुटावा. तरुणाईने अतिउत्साहाला आवर घालावा. धोकादायक ठिकाणी प्रवेश करू नये. - राजाराम काशीद, वनपाल, रोहोट