नागठाणे : नागठाणे केंद्र शाळेची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. यात शाळेतील शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नागठाणे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत रविवारी रात्री अज्ञातांनी तोडफोड करून मोठे नुकसान केले. या प्रकाराने शाळेचे सुमारे ५० हजारांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या घटनेमुळे नागठाणे येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.शाळेत मुलांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा पीव्हीसी पाइप कापण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. अनेक वर्गांच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. शैक्षणिक साहित्य असलेल्या खोलीचा दरवाजा उचकटून आतील साहित्य बाहेर फेकण्यात आले. कंपाऊंडचेही नुकसान झाले आहे.या सर्व प्रकारची बोरगाव पोलिसांनी तसेच नागठाणे ग्रामपंचायतीने गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी तसेच सर्व शिक्षकांनी व शिक्षण विभागाने केली आहे.
साताऱ्यातील नागठाणे केंद्र शाळेतील साहित्याची तोडफोड, दुसऱ्यांदा घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 3:41 PM