कुडाळ : जावळी तालुक्यातील केळघर परिसरातील गावांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासाठी डांगरेघर येथे वेण्णा नदीवर ग्रामस्थांनी श्रमदानातून दोन वनराई बंधारे बांधले आहेत.
याकरिता जिल्हा परिषद सदस्य अर्चना रांजणे, ज्ञानदेव रांजणे व उद्योजक राजेंद्र धनवडे यांनी सहकार्य केले. या भागात मोठ्या प्रमाणावर पर्जन्य होते. मात्र तीव्र उतारामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. उन्हाळ्यात या भागात पाणीटंचाई जाणवते. ग्रामस्थांनी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन त्याचा सार्वजनिक विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. यामुळे येथील ग्रामस्थ, युवावर्ग, महिलांनी एकत्रित येऊन नदीवर दोन बंधारे बांधले आहेत. सध्या यात चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट दूर होण्यास मदत होईल, अशी लोकांना आशा आहे. ग्रामस्थांच्या एकीतून पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी केलेला प्रयत्न उल्लेखनीय आहे. प्रत्येक गावातील लोकांनी अशाप्रकारे श्रमदान केल्यास गावच्या विकासास नक्कीच हातभार लागेल.