सातारा : पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. वॉटर कपमधील विजेत्यांना सन्मानित आणि या स्पर्धेतील हिरोंचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सह संस्थापक आमीर खान उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक गावांना दुष्काळाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागतो. गावांना दुष्काळाच्या या मगरमिठीतून सोडविण्याचे व जलसंधारणाच्या मार्गाने गावांना पाणीदार करण्याचे काम पाणी फाउंडेशन मागील दोन वर्षांपासून करत आहे. केवळ लोकचळवळीतून दुष्काळावर मात करता येते. या विचारातून २०१६ मध्ये अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली.
या फाउंडेशनने लोकांना जलसंधारणाचे विज्ञान शिकवण्यासाठी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी खास ट्रेनिंग प्रोग्रामची आखणी केली आहे. गावातल्या लोकांना एकत्र आणून ट्रेनिंगमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर गावकºयांनी करावा यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे दरवर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले जाते.
पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ म्हणाले, ‘हा समारंभ म्हणजे सामाजिक स्तरातील विविध लोकांचा संगम असेल. शेतकरी, उद्योजक, अभिनय क्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्ती, शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते हे सर्व एकत्र येऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांचा गौरव करणार आहेत.
पाणी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव यांनीही या वॉटर कपनिमित्त गावागावांमध्ये आलेल्या त्यांच्या अनुभवाविषयी सांगितले. गावांमधील लोकांचा, विशेषत: महिलांचा या चळवळीतील सहभाग पाहून मी भारावून गेले आहे. गावांमध्ये असणाºया प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून या चळवळीसाठी योगदान देण्याची त्यांची भावना वाखाणण्याजोगी आहे. १३ जिल्हे ३० तालुके...सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ मध्ये सहभागी झालेल्या १३ जिल्ह्यांतील ३० तालुक्यांमध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज आणि धारुर. लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा आणि कळंब. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि खुलताबाद, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण आणि खटाव, पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि इंदापूर, सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि उत्तर सोलापूर, अकोला जिल्ह्यातील बार्शी-टाकळी, पातूर आणि आकोट, वाशिम जिल्ह्यातील कारंजा, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब आणि उमरखेड, वर्धा जिल्ह्यातील आर्वी, अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धारणी या गावांचा समावेश होता.