मसूर : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस गुरूवार, दि. २९ रोजी साजरा होत आहे. यादिवशी कऱ्हाड उत्तर मतदारसंघात पर्यावरणपूरक वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यामध्ये सकाळी नऊ वाजता रहिमतपूर, नागठाणे, उंब्रज, पुसेसावळी येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. कऱ्हाड तालुक्यामधील हजारमाची, कोर्टी येथे सकाळी साडेदहा वाजता महिला आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. पेरले येथे दुपारी साडेबारा वाजता घनवन (मियावाकी) प्रकल्पांतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. रहिमतपूर, धामणेर, हजारमाची, किवळ, खोडजाईवाडी येथे घनवन प्रकल्पांतर्गत ३५ गुंठे क्षेत्रावर साडेदहा हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
नाबार्ड दिल्लीचे माजी अध्यक्ष वाय. एस. पी. थोरात यांचे ‘शेती व सहकार’ या विषयावर दुपारी दोन वाजता मार्गदर्शनपर व्याख्यान व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात येणार आहे. कऱ्हाड उत्तर मतदार संघातील २०५ गावांमध्ये एकाचवेळी ४,१०० लिंबू रोपांचे रोपण केले जाणार आहे. या अनुषंगाने प्रातिनिधीक स्वरूपात पिंपरी येथे दुपारी सव्वातीन वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते साठ लिंबू रोपांचे रोपण करण्यात येणार आहे.
सह्याद्री साखर कारखाना कार्यस्थळावर दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील तेराशे कर्मचाऱ्यांना तैवान वाणाच्या एक किलो वजनाचे फळ देणाऱ्या पेरू रोपाचे वितरणाचा कार्यक्रम खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आणि आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, सुनील माने, शहाजी क्षीरसागर, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, प्रणव ताटे, संगीता साळुंखे, चंद्रकांत जाधव, जितेंद्र पवार, नंदकुमार बटाणे, आनंदा कोरे, डी. बी. मोहिते, आबासाहेब पाटील, संजय रामचंद्र पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहेत.
बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मसूर, हेळगाव, उंब्रज येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिला आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्याचबरोबर नांदगाव येथे नेत्ररोग निदान शिबिर आयोजित करुन सहाशे रूग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
पाटण, वाई, महाबळेश्वर, सातारा, जावळी तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूर व भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात यावी, त्या निधीचा विनीयोग शाश्वत व कायमस्वरूपीच्या विकासकामांसाठी करण्यात येईल आणि वाढदिवसानिमित्त केक, हार, शाल, श्रीफळ, बुके यासाठी खर्च करू नये, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. (वा. प्र.)