कऱ्हाड : नांदगाव (ता. कऱ्हाड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका दिवंगत सिंधूताई विश्वनाथ सुकरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, कोरोना महामारी संकट आपली अद्यापही पाठ सोडायला तयार नाही. त्यातच डेंगू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी आजारांनी डोके वर काढले आहे. आपण सर्वजण एका कठीण परिस्थितीतून वाटचाल करीत आहोत याचे भान ठेवून ‘माझं गाव माझी जबाबदारी’ ओळखून हे उपक्रम आम्ही राबवत आहोत.
रविवार, दि. १९ रोजी सकाळी ११ वाजता नांदगावमध्ये स्वखर्चातून डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर कळत नकळत विपरीत परिणाम झालेले आहेत, होत आहेत. म्हणूनच पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या नांदगाव, मनव, पवारवाडी येथील विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब कऱ्हाडच्या साह्याने सोमवार, दि.२० रोजी सकाळी १० वाजता मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित केले आहे.
याच दिवशी सर्दी, खोकला, दमा अशा अनेक जुनाट आजारांनी त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी मोफत होमिओपॅथी शिबिर आयोजित केले आहे. मंगळवार, दि. २१ रोजी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदगावमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन करण्यात येणार आहेत. तरी यात सहभागी व्हावे. आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रशांत सुकरे यांनी केले आहे.