पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेला गेल्या पंधरा-वीस दिवसांत वळीव पाऊस, तौक्ते चक्रीवादळाचा पाऊस तसेच मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे महिनाभरात कास तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन साधारण तीन ते साडेतीन फूट पाणी वाढले. चक्रीवादळाच्या तडाख्यात एका बाजूला प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे पाणीसाठ्यात वाढ होऊन दिलासाही मिळाला आहे.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. यापैकी कास ही सर्वात जुनी पाणी पुरवठा योजना आहे. पंचवीस फूट पाणी साठवण क्षमता असलेल्या कास तलावातून शहराला दररोज साडेपाच लाख लीटर पाण्याची गरज भासते. उन्हाळा सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणीपातळी खालावते. मागील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीपातळी अगदी नऊ फुटांच्या खाली आली होती. यामुळे सातारकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता असतानाच वळीव, तौक्ते चक्रीवादळ व मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणावर होऊन वरुणराजाची सातारकरांवर कृपा झाली अन् पाणीपातळी तीन ते साडेतीन फुटाने झपाट्याने वाढली. सद्यस्थितीत तलावातील पाणीपातळी साडेअकरा फूट एवढी असून, सातारकरांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
(चौकट)
सततच्या पावसाने जमिनीची धर धरण्यास मदत झाली आहे. तसेच तीव्र ऊन नसल्याने पाण्याचे बाष्पीभवनही होत नाही. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तसेच झरेदेखील फुटल्याने पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होत आहे. सध्या मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. मान्सून काही दिवस लांबणीवर जरी गेला तरी सातारकरांना मान्सून सुरू होईपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा तलावात उपलब्ध आहे.
०९ पेट्री
( छाया -सागर चव्हाण )