सांगली : कारखान्यावर मोठे अर्थचक्र अवलंबून असल्याने तो सुरू करण्यासाठी जिल्हा बॅँकेने शर्थीचे प्रयत्न केले. त्यात यश मिळाले. आता हा कारखाना दराच्या स्पर्धेत भारी ठरेल, असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाखाली वसंतदादा कारखान्याच्या पहिल्याच गळीत हंगामास सोमवारी प्रारंभ झाला. पाटील यांच्यासह वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, दत्त इंडिया कंपनीचे प्रमुख प्रेमजी रुपारेल, अध्यक्षा प्रीती रुपारेल, संचालक जितेंद्र धारू, महानुभव पंथाचे श्यामसुंदर महाराज, विजयराज महाराज यांच्याहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली.
यावेळी दिलीपतात्या पाटील म्हणाले, हा कारखाना सुरू करण्यासाठी मी पुढाकार घेतल्यानंतर राजकीय क्षेत्रात अनेकांना आश्चर्य वाटले. यामध्ये जयंत पाटील यांचा एखादा डाव आहे का, असा संशय व्यक्त होऊ लागला. सहकार आणि कारखानदारीत मी कधीही राजकारण केलेले नाही. वास्तविक जयंत पाटील यांनीच हा कारखाना सुरू करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिला.
कारखान्यावर या परिसरातील अर्थचक्र अवलंबून आहे. हा कारखाना चालला तर बाजारपेठ कशी फुलते, हे याठिकाणच्या नागरिकांनी, व्यावसायिकांनी पाहिलेले आहे. त्यामुळेच निविदा काढून हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला. कारखाना आता चालू झाला असून, दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाखाली दराच्या स्पर्धेतही तो शेतकºयांना न्याय देईल, याची खात्री आहे. शेतकºयांची व निवृत्त कामगारांची देणीही दिली जातील.
विशाल पाटील म्हणाले, कारखाना भाड्याने देण्यासाठी खूप प्रयत्न केले. चांगले भाडे देण्याची तयारी दत्त इंडियाने दर्शविली. हे व्यवस्थापन कमी दराची परंपरा मोडून जादा दराची परंपरा निर्माण करेल. कारखान्याचा काटा चांगला आहे. श्यामसुंदर महाराज म्हणाले, भडकाविणाऱ्या लोकांपासून कामगार व शेतकऱ्यानी सावध रहावे.
यावेळी कार्यक्रमास चेतन धारू, जितेंद्र पारेख, परीक्षित धारू, डी. के. पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. कारखान्याचे प्रमुख अधिकारी मृत्युंजय शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिनेश्वर पाटील यांनी आभार मानले.
उसाचे बिल : दर बुधवारी खात्यावर जमा होणारवसंतदादा कारखान्याने शेतकऱ्याच्या खात्यावर दर बुधवारी पैसे जमा करण्याचे नियोजन केले आहे. आठ दिवसातील गाळपाची बिले तातडीने दिली जातील, अशी माहिती दत्त इंडिया कंपनीच्या अध्यक्षा प्रीती रुपारेल, संचालक जितेंद्र धारू यांनी पत्रकार परिषदेत दिली. रुपारेल म्हणाल्या की, वसंतदादा साखर कारखान्याचा वजन काटा हा जिल्ह्यात चांगला आहे.
कारखान्याच्या वजन काट्याची खात्री करून घेण्यासाठी बाहेरून वजन करून ऊस पाठविला तरी चालेल. कारखान्यात आलेल्या उसाचे वजन पाहण्याची सोय केली आहे. काही मिनिटातच संबंधित वाहतूकदार आणि शेतकऱ्याला त्याबाबतचा मेसेज मोबाईलद्वारे दिला जाईल.
दररोज सात हजार टन गाळपाचे उद्दिष्टधारू म्हणाले की, कारखान्याने यंदाच्या हंगामासाठी ४० हजार एकरवरील उसाची नोंद घेतली आहे. ७ ते ८ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. तोडणी-वाहतूक यंत्रणा सज्ज आहे. टोळ्या भागात दाखल झाल्या आहेत. पहिले दोन दिवस दोन ते तीन हजार गाळप केले जाईल. त्यानंतर स्टीम ज्याप्रमाणात वाढेल, त्यानुसार गाळप वाढविले जाणार आहे.
दररोज ६ ते ७ हजार टन उसाचे गाळप केले जाणार आहे. या कारखान्याचा योग्य वजनासाठी जिल्ह्यात लौकिक आहे, तो कायम ठेवला जाईल. कारखान्याच्या वजन काट्याविषयी शंका असल्यास बाहेरून वजन करून आले, तरी हरकत घेतली जाणार नाही. यावर्षी जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला जाईल.
एफआरपीपेक्षा जास्तच दरकारखान्याची एफआरपी कमी असली तरी, एफआरपीचा विचार न करता शेतकऱ्याना जादा दर दिला जाईल. यावर्षी सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्याना पुढील वर्षी प्राधान्याने त्यांच्या उसाचा चांगला मोबदला आम्ही देऊ. त्यामुळे शेतकऱ्यानी जास्तीत-जास्त ऊस कारखान्याला द्यावा. संघटना व शेतकºयांनी हा कारखाना नव्याने उभारण्यासाठी कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.