शिरवळ : ‘कोण पोलीस, कुठली ग्रामपंचायत, कुठले प्रशासन.. आम्हांला काय माहीत नाही. आम्ही ओळखतही नाही यांना...’ हे वाक्य आहे नायगाव-शिरवळ रोडवरील येथील व्यापाऱ्यांचे. विशेष म्हणजे रविवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश असूनही चक्क भाजी मंडई जोमात सुरू होती.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ-नायगाव रस्त्यावर कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भाजी मंडईचे प्रस्थ जोमात आले आहे. याकडे शिरवळ ग्रामपंचायतीसह प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने येथील कोरोना संपला आहे की काय? असा प्रश्न येथील गर्दी पाहिल्यानंतर निर्माण होतो. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवारी लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करीत अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पारित केले आहेत.
दरम्यान, सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश बासनात गुंडाळत शिरवळ-नायगाव रोडवर व्यापाऱ्यांनी कोणाच्या वरदहस्ताने भाजी मंडई मोठ्या प्रमाणात साकारली आहे हा प्रश्न निर्माण होत असून वारंवार पोलीस प्रशासनाकडून कारवाई होऊनही याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी मंडई जोमात सुरू आहे. त्यामुळे एकीकडे शिरवळ येथील भाजी मंडईतील विक्रेत्यांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारत असताना पंढरपूर फाट्यावरील शिरवळ-नायगाव रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात भरणारी भाजी मंडई प्रशासनाला दिसत नाही का? असा प्रश्न शिरवळकर नागरिकांना पडला आहे. त्यामुळे याठिकाणी बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेली भाजी मंडई प्रशासनाने बंद करावी अशी मागणी शिरवळकर नागरिकांकडून करण्यात आली आहे.