कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याची आणि आवश्यक तिथे कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्याअंतर्गत आता पंचायत समितीमार्फत गावोगावी दक्षतेच्या सूचना गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी दिल्या आहेत. विविध गावात आवश्यक त्या उपाययोजना आणि कारवाईची सुरुवात ग्रामपंचायतींनी केली आहे. सैदापूर येथील विद्यानगर भागात गाडगे महाराज महाविद्यालयाच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील बाजूस भाजी मंडई भरत होती. ग्रामविकास अधिकारी संजय निंबाळकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ती मंडळी हटवली. मंडईत गर्दी झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता विचारात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे दुकाने तसेच व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी झाल्यास कारवाई करण्यात येणार असून यापुढेही कारवाई सातत्याने सुरू राहील, असे ग्रामविकास अधिकारी संजय निंबाळकर यांनी सांगितले.
विद्यानगरमधील भाजी मंडई हटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:46 AM