नितीन काळेल ।सातारा : बालमृत्यू, कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाडीच्या आवारात परसबागेची निर्मिती करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला असलातरी सातारा जिल्हा एक पाऊल पुढे आहे. जिल्ह्यातील पन्नासहून अधिक अंगणवाड्यांच्या परिसरात अनेक वर्षांपासून परसबागा आहेत. तेथील भाजीपाल्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या आहारासाठी होतो.
राज्यात बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण आहे. यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत असते. त्यामुळे आता लहान मुलांसाठी राज्य शासनाच्या वतीने अंगणवाडीच्या आवारात परसबागा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशनमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांत रिलायन्सच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर असे दहा हजार मॉडेल राबविण्यात आली आहेत. या करारामधून आता राज्यात २५ हजार अंगणवाड्यांमध्ये परसबाग निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे; पण राज्य शासनाने हा निर्णय आता घेतला असलातरी अनेक अंगणवाड्यात परसबाग तयार केल्या आहेत.
जिल्ह्यात एकात्मिक बालविकास विभागांतर्गत अंगणवाडींचे १८ प्रकल्प कार्यान्वित आहेत. दहिवडी, म्हसवड, सातारा, पाटण, कोरेगाव, फलटण, खटाव, खंडाळा, वाई आदी ठिकाणी ते असून, या केंद्रांतर्गत किमान चार-पाच ठिकाणच्या अंगणवाडीच्या आवारात तरी परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे. अनुदान नसतानाही लोकसहभागातून या परसबागा तयार केल्या आहेत. त्यामध्ये वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, हिरव्या पालेभाज्या, फळांची झाडे आहेत.कुपोषणाची समस्या कमी होणार...अंगणवाड्यातील बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषणाची समस्या जाणवते. त्यामुळे परसबागेतील ताजी फळे, भाज्यामधून बालकांना पोषण आहार मिळेल आणि कुपोषणाची समस्या कमी होईल, असा दावाही सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील सुमारे ५० हून अधिक अंगणवाड्यांच्या आवारात गेल्या काही वर्षांपासून परसबागा आहेत. त्यामधील पालेभाज्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या आहारासाठी होत आहे. तसेच फळे विद्यार्थ्यांना खाण्यासाठी देण्यात येतात.- जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी