सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. कारण शेतमाल भरपूर असला, तरी व्यापारी दर पाडू लागले आहेत, तर सायंकाळच्या वेळी भाजीपाला खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडतात. नेमके त्याच वेळी बाजारपेठ व व्यवहार बंद होत असल्याने भाज्या पडून राहत आहेत, यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
जिल्ह्यात तरकारीचे मोठे क्षेत्र आहे. सातारा तालुक्यासह जावळी, कोरेगाव, खटाव या तालुक्यातील अनेक शेतकरी तरकारीच भाजीपाला घेतात. सातारा बाजार समितीत तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शेतमाल येतो. दररोज ५० ते ६० वाहनांतून शेतमाल येतो, पण लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दरावर परिणाम होऊ लागला आहे.
उन्हाळ्यात भाज्यांना मागणी असते, तसेच पुरवठा कमी होतो. त्यामुळे भाज्यांचे दर वाढलेले असतात, ही वस्तुस्थिती आहे, पण सध्या भाजीपाला उपलब्ध असला, तरी शेतकऱ्यांसाठी नाराजीचे वातावरण आहे. कारण कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतमालाला मागणी कमी आहे. सातारा बाजार समितीत तर दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असला, तरी दर कमी होत चालले आहेत. व्यापारी भाजीपाला घेतात, पण पुढे ग्राहकच नसेल तर विकायचा कोठे हा प्रश्न आहे. कारण लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडण्यास टाळतात. त्यातच सायंकाळी सहापर्यंत मंडई बंद होते. याच दरम्यान, भाज्यांची खरेदी होते, पण लोकांना बाहेरच पडता येत नसल्याने भाजीपाला विक्री कमी झाली आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकरी पुणे, मुंबईच्या बाजार समितीत भाजीपाला पाठवितात. तेथेही अशीच स्थिती आहे, कारण शेतमाल पाठविला आणि खरेदी केलाच नाही, तर पदरमोड करावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुणे-मुंबईला शेतमाल पाठविण्याचे धाडसच केले नाही. त्यातच भाज्यांचे दर उतरू लागले आहेत. अशा वेळी शेतमाल बाहेर पाठविणे धाडसाचे ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर शेतकरी जमेल, तसा भाजीपाला विक्री करु लागले आहेत, तरीही अपेक्षित दर येताना दिसून येत नाही.
चौकट :
विक्रीच्या प्रमाणात खरेदी...
सातारा शहरात दररोज सायंकाळी भाजी मंडईत खरेदीसाठी गर्दी असते, तसेच याच वेळी राजवाडा परिसरात अनेक वाहनांतून भाजीपाला विकण्यात येतो. त्यामुळे शेतमाल बघता-बघता विकला जातो, पण कोरोनामुळे सायंकाळी सहानंतर सर्व व्यवहार बंद होतात. परिणामी, भाजीपाला विक्रीच होत नाही. त्यामुळे व्यापारीही विक्रीच्या प्रमाणात भाजीपाला घेताना दिसून येत आहेत. त्यातच काही व्यापारी आता ठरलेल्या दरापेक्षा कमी भाव देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
................................................................