जगदीश कोष्टी।सातारा : वेळ दुपारी बारा-साडेबाराची... एक परिचारिका रुग्णालयात निघालेल्या... पण दुचाकी पंक्चर झाल्यानं काय करावं कळेना... सर्वच दुकाने बंद, हवा भरून मिळणेही अवघड. रिक्षा दिसेना, त्यामुळे त्यांनी दुचाकी ढकलत नेण्याचा पर्याय निवडला. दोन किलोमीटर गाडी ढकलून घामाच्या धारा लागल्या. अशात दुचाकीवरून एक काका आले. त्यांनी चौकशी केली अन् काही मिनिटांत गाडीची पंक्चर काढून दिली.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अन् पोलिसांनी चांगलीच खबरदारी घेतली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने, हॉटेल बंद ठेवली आहेत. यामुळे रोग नियंत्रणासाठी फायदा होत असला तरी काही वेळेला फटका बसत आहे. पण त्यावर फारशी चर्चा होत नाही.
अत्यावश्यक सेवेत पोलीस, आरोग्य कर्मचारी, बँक, पत्रकार यांचा समावेश होतो. त्यांना वाहनांना वापर करण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो; पण उन्हाची तीव्रता वाढत असल्याने हवा जाणे, ट्यूबच्या जुन्या पंक्चरची ठिगळं उचकटत आहेत. मात्र, रस्त्यावर हवा, पंक्चर काढणारी दुकाने बंद असल्याने हाल होत आहेत. अशांसाठी रामचंद्र मोहिते यांची चांगलीच मदत होते.
केसकर कॉलनीत राहत असलेले रामचंद्र मोहिते यांचे मंगळवार तळे परिसरात तसेच राजवाडा चौपाटी परिसरात पंक्चर काढण्याचे दुकान आहे. पंक्चर काढण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य सोबत असल्याने त्यांनी चार दिवसांसाठी एका परिचारिकेला मदत केली. ही घटना सोशल मीडियातून व्हायरल झाली. त्यामुळे अडचणीच्या वेळी सर्वांना मोहिते काकांची आठवण येते.दुचाकीच्या इंजिनद्वारे हवा मारण्याची सोयया आठ दिवसांत सुमारे दोनशे गाड्यांची पंक्चर रामचंद्र मोहिते यांनी काढली आहे. यामध्ये पोलीस, आरोग्य, बँक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हवा मारण्यासाठी कॉम्प्रेसरची गरज असते; पण मोहिते यांनी ही सुविधा दुचाकीच्या इंजिनला जोडली आहे.
मोहिते यांना फोन करून बोलावून घेतात. गाडी ज्या ठिकाणी असेल तेथे स्वत:च्या दुचाकीवरून जाऊन काही वेळेत पंक्चर काढून देतात. यासाठी जादा शुल्क आकारत असले तरी वेळेला मदत नक्कीच होते.- राहुल पाटील, सातारा.
पंक्चर दुकानाचा अत्यावश्यक सेवेत समावेश केलेला. त्यामुळे मदतीसाठी लांब अंतरावर जाण्यात अडचणी येतात. पोलिसांनी वाहन परवाना दिला तर हे काम करणे आणखी सोपे जाणार आहे.- रामचंद्र मोहिते, सातारा