सातारा : कोरोना प्रतिबंधासाठी सातारा पालिका अहोरात्र झटत असली तरी शहर व वाढीव भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. मागणी करूनही अनेक भागांत निर्जंतुकीकरण करणारी गाडी चार-चार दिवस फिरकतही नाही. असे असताना सातारा पालिकेच्या गाड्या जावळी तालुक्यात जाऊन निर्जंतुकीकरण करून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. रुग्णवाढीचा वेग अधिक असल्याने प्रशासनाकडून संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. सातारा शहरातही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने पालिका प्रशासाने उपाययोजनांची तीव्रता वाढविली आहे. प्रत्येक प्रभागात सोडियम हायपोक्लाराइडद्वारे निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, शहर व वाढीव भागात ही मोहीम राबविताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.
सद्यस्थितीत अग्निशमन विभागाची एक गाडी व एका ट्रॅक्टरवरी संपूर्ण शहराची मदार आहे. शिवाय आपला प्रभाग सुरक्षित रहावा, यासाठीदेखील नगरसेवकांमध्ये निर्जंतुकीकरण करण्याची स्पर्धा लागली आहे; परंतु मागणी करूनही शहरच काय तर हद्दवाढीत आलेल्या भागात वेळेवर औषध फवारणी केली जात नाही. असे असताना सातारा पालिकेच्या अग्निशमन गाडीने थेट जावळी तालुक्यात निर्जंतुकीकरण मोहीम राबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अग्निशमनच्या गाडीने एप्रिल महिन्यात दोनदा, तर मे महिन्यात दोन वेळा जावळी तालुक्यातील विविध गावांत निर्जंतुकीकरण केले आहे. जावळीपेक्षा सातारा शहर व तालुक्यात निर्जंतुकीकरणाची गरज असताना पालिकेच्या गाड्या जावळी तालुक्यात जातात कशा? प्रशासनाकडून याची रितसर परवानगी घेण्यात आली किंवा नाही, निर्जंतुकीकरणाचा खर्च अदा करण्यात आला का? या प्रश्नांचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.
(चौकट)
स्वत:ची व्यवस्था उभारावी
कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यामुळे सातारा पालिकेने इतर तालुक्यांना जरूर मदत करावी, परंतु शहर व वाढीव भागात उपाययोजना राबविण्यास प्रथम प्राधान्य द्यावे. संकट गंभीर असल्याने मेढा नगरपंचायतीनेदेखील तालुक्याची संपूर्ण जबाबदारी घेणे क्रमप्राप्त आहे. निर्जंतुकीकरणासाठी नगरपंचायतीने सक्षम व्यवस्था उभारणेही तितकेच गरजेचे आहे.