पेट्री : कासपठार परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असतानाही पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची वर्दळ सुरू आहे. पश्चिमेस दिवसभर दाट धुके पसरत असून, समोरून आलेली वाहने दिसत नसल्याने आपापल्या वाहनांची दिवे सुरू आहे ना, हे पाहणे अत्यावश्यक असून अपघात टाळणे सोपे जाईल.
सातासमुद्रापार ओळख असणारे कास पठार, भारतातील सर्वाधिक उंचीचा वजराई धबधबा, इतर कोसळणारे धबधबे, दाट धुक्यात हरवून जाणारा कास तलाव, कास बामणोली परिसरातील मनमोहक निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पावसाळ्यात परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. सध्या वाहनांची ये-जा परिसरात आहे. मार्गावर ठिकठिकाणी धोकादायक वळणे असून, परिसरात दाट धुक्याच्या दुलईसह पावसाची संततधार आहे.
दिवसभर असणाऱ्या दाट धुक्यात समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येण्यासाठी वाहनचालकांनी वाहनांची दिवे सुरू करण्यासंदर्भात सावधान असणे अत्यावश्यक आहे. कित्येकदा वाहनांचे दिवे सुरू नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा संभव आहे. वाहनचालकांनी वाहनांचे दिवे सुरू आहे की नाही, याची तपासणी अत्यावश्यक आहे.
बऱ्याचदा दिवे सुरू नसल्याने दुसरे एखादे वाहन अगदी जवळ आल्यावर समजते. तेव्हा वाहनांवर नियत्रंण ठेवणे अवघड जाते. ऐनवेळी दिवे सुरू असण्याअभावी समोरून आलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने वाहन रस्त्याच्या कडेला घ्यावे तर रस्त्यालगत लाल मातीवरून वाहन घसरण्याची अधिक शक्यता आहे. शेतकरीवर्गाची रस्त्यावरून सतत ये-जा सुरू असल्याने वाहन दिसण्यासाठी दिवे सुरू असणे गरजेचे आहे.
(चौकट)
करडी नजर आवश्यक..!
कासपठार परिसरात फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पावसाची रिमझिम, दाट धुक्यामुळे दूरवरून समोरून येणारे वाहन दिसत नाही. स्टंट, हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून अतिवेगाने वाहने चालविल्यामुळे अपघाताची शक्यता असल्यामुळे पोलिसांची कायमस्वरूपी करडी नजर आवश्यक आहे.
(कोट)
आपल्या चुकीमुळे समोरून येणाऱ्या वाहनाला कोणताही अडथळा होऊ नये, भविष्यात दुर्दैवी घटना टाळण्यासाठी दाट धुक्यातून प्रवास करताना वाहनांचे दिवे दिवसाही सुरू ठेवणे आवश्यक आहे. मार्ग वळणावळणाचा, घाट रस्ता असल्याने दिवसा रात्रीदेखील रस्ता दिसण्यासाठी जिलेटिनचा पिवळा कागद दिव्याला लावून गडद पिवळा उजेड पडून रस्ता स्पष्ट दिसण्यास मदत होते.
-निकेश पवार, वाहनचालक, सातारा
(पॉइंटर..)
अशी घ्यावी काळजी !
- वाहनाचा वेग कमी.
- हेडलाइट सुरू ठेवूनच वाहने चालवावीत.
- वळण घेतेसमयी इंडिकेटर सुरू.
-वेळप्रसंगी दाट धुक्यातून वाहन चालविताना पार्किंग लाईट सुरू.
अधेमधे वाहने रस्त्यावर उभी करू नये. वेळप्रसंगी गरज भासल्यास पुष्कळ जागा पाहून गाडी रस्ता सोडून बाजूला पार्क करावीत.
२७पेट्री
(छाया-सागर चव्हाण)