महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले.महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १३५५.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर चोवीस तासांत १५० मिलिमीटर पावसाची नोद करण्यात आली. महाबळेश्वर शहर व परिसरात जुलै महिन्याच्या प्रारंभापासूनच पावसाने झोडपून काढले.आठ ते दहा दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तमाम महाबळेश्वर-पाचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास वेण्णालेकच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. याच वेण्णालेकमधून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.
महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला!, सांडव्यावरून वाहू लागले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 5:39 PM