मायणी : ‘जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अत्यवस्थ रुग्णांना आवश्यक असणाऱ्या व्हेंटिलेटरची सुविधा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू करून जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयावरील ताण कमी करावा, यासाठी शासनाने जिल्हा नियोजन मंडळास उपलब्ध करून दिलेल्या निधीतून हे कक्ष उभारावेत,’ अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केली.
गुदगे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटिलेटरची कमतरताही भासत आहे. व्हेंटिलेटर कक्ष जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातच असल्याने तेथील यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. व्हेंटिलेटर कक्ष चालवण्यासाठी एमडी फिजिशियन यांची आवश्यकता असते. वैद्यकीय विभागाकडे अशा डॉक्टरांची संख्या कमी असल्याने जिल्हा रुग्णालयात असे व्हेंटिलेटर कक्ष खासगी एमडी फिजिशियन 'व्हिजिटिंग अवर्स' या तत्त्वावर चालवतात. याच धर्तीवर तालुकास्तरावर व्हेंटिलेटर कक्ष उभे करून त्या-त्या तालुक्यातील खासगी एमडी फिजिशियनच्या मदतीने कक्ष चालवावेत. जिल्हा परिषदेकडे तीन कोटीचा निधी शिल्लक आहे. या निधीतून तालुकानिहाय किमान दहा बेडचे व्हेटिलेटर कक्ष तातडीने उभे करून रुग्णांना दिलासा देण्याबरोबरच जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयावरील येणारा ताण कमी करावा.’