स्टार : ७३७
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पीएम केअर्स फंडातून जिल्हा शासकीय रुग्णालयात देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स अचानक बंद पडत असल्याच्या तक्रारी पुढे आले आहेत. याबाबत कोणीही स्पष्टपणे बोलत नसले तरीही ही यंत्रे निरुपयोगी असल्याची पावती अनेकांनी ‘ऑफ रेकॉर्ड’ दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटर्सअभावी अनेकांना प्राणांना मुकावे लागले होते. याबाबीचा गांभीर्याने विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर देण्यात आले. सामान्यांच्या काळजीस्तव दिल्या गेलेल्या या यंत्राविषयी राज्यासह देशातील अनेक ठिकाणांहून तक्रारी येऊ लागल्या आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर याबाबत ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, ‘अतिगंभीर रुग्णांसाठी या व्हेंटिलेटर्सचा पहिल्यांदा वापर केला. नवे मशीन असल्यामुळे ते निर्दोष असणार याची खात्री होती. मात्र, पहिल्या महिन्याभरातच हे यंत्र अचानक बंद पडू लागले. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर त्याची दुरुस्ती करून त्याचा वापर करण्यात आला. नवीन व्हेंटिलेटरची अशी अवस्था असेल तर रुग्णांचा जीव कसा वाचणार, असा प्रश्नच आहे.’
गेल्या काही महिन्यांत साताऱ्याची रुग्णसंख्या दोन हजारांच्या सुमारस आहे. व्हेंटिलेटरसाठी रुग्ण वेटिंगवर असतात. त्याचवेळी नवे व्हेंटिलेटर वापरता येत नसल्याची स्थिती आहे. काही काळे हे व्हेंटिलेटर बंद असताना अभियंत्यांकडून दुरुस्त करण्यात आल्यानंतर ते सुरळीतपणे चालले. पण मध्येच ते बंद पडत असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची भीती आहे.
चौकट :
प्रशासनाकडून प्रतिसाद नाही
अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या रुग्णासाठीच व्हेंटिलेटरचा वापर केला जातो. हे व्हेंटिलेटर दाखल झाले तेव्हा मदतीला मजबूत हात आल्याची भावना होती. पण पहिल्या काही दिवसांतच हे बंद पडल्याने रुग्णांच्या जिवावर बेतणारे काही प्रसंगही घडले. याबाबत वरिष्ठांच्या कानावर घातले तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत सांभाळून घ्या कोणी मुद्दाम तशा मशीन पाठविल्या नाहीत, असे आम्हालाच सांगितल्याचे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
पॉइंटर
जिल्ह्याला मिळालेले व्हेंटिलेटर :
शासकीय रुग्णालय :
ग्रामीण रुग्णालय :
कोरोनाचे दाखल रुग्ण :
काम कमी अन् देखभाल जास्त
जिल्ह्यात रौद्ररूप धारण केलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हैदोस मांडलेला असतानाच पीएम केअरचे व्हेंटिलेटर जिल्ह्यात दाखल झाले. रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होत नसेल तर त्याची दुरुस्ती करावी लागते. यामुळे हे व्हेंटिलेटर बंद ठेवावे लागायचे. हे व्हेटिलेटर रुग्णांच्या उपचारापेक्षा देखभालीसाठीच जास्तवेळ गेल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
.............