लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : स्वामी रामदासांनी परमार्थाबरोबरच प्रपंच नेटका कसा करावा हेही सांगितले आहे. त्यांचा मानवी मनो व्यापारांचा प्रचंड अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी प्रत्येक कृतीमागे मनाचे आदेश काय करतात हे जाणून मनालाच उपदेश करण्यासाठी मनाचे श्लोक लिहिले आहेत. त्या श्लोकांचा अर्थ सुलभरीत्या समजावून देणारे अरुण गोडबोले यांचे हे पुस्तक म्हणूनच सार्वकालिक महत्त्वाचे आहे, असे मत प्रा. पुरुषोत्तम शेठ यांनी व्यक्त केले.
‘मनाचे श्लोक एक मागोवा’ या पुस्तकाच्या साठाव्या आवृत्तीचे लोकार्पण करताना ते बोलत होते. १९९३ साली प्रकाशित झालेले पुस्तक आज २७ वर्षांनंतरही लोकांना आवश्यक वाटते ही बाब महत्त्वाची आहे. कोरोनामुळे अतिशय घरगुती प्रकारे हे लोकार्पण करण्यात आले. यावेळी लेखक अरुण गोडबोले यांनी मनोगत व्यक्त केले. सुजाण वाचकांच्या प्रतिसादामुळे त्यांच्या सतत नवनवीन आवृत्त्या काढाव्या लागल्या. समर्थांचे विचार मला सर्वांपर्यंत पोहोचवता आले हे याचे वेगळेच समाधान आहे, असे यावेळी गोडबोले म्हणाले.
फोटो ओळी ...‘श्री मनाचे श्लोक एक मागोवा’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रा पुरुषोत्तम शेठ, शेजारी अरुण गोडबोले.