सातारा/शेंद्रे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील शेंद्रे हद्दीत महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये दोघे सख्ख्ये भाऊ ठार तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. मौझ अदील खोत (वय १७), अजम अदील खोत (१८, रा. भिवंडी, ठाणे) अशी ठार झालेल्या सख्ख्या भावंडांची तर साफिया फरहान खोत (३५), चालक तौफीक शौकत शेख (२७, रा. भिवंडी) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खोत कुटुंबीय भिवंडीहून कारने कोल्हापूरला निघाले होते. खिंडवाडीजवळ उताराला ट्रक बंद पडला होता. या उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या समोरच्या बाजूचा अक्षरश: चक्काचूर झाला. चालकाच्या शेजारी बसलेला मौझ हा जागीच ठार झाला तर इतर चौघेही गंभीर जखमी झाले. क्रेनच्या साह्याने कार बाजूला काढण्यात आली. त्यानंतर जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तत्पूर्वीच मौझ खोतचा मृत्यू झाला होता तर अजमचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. दोघा सख्ख्या भावंडांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी रुग्णालयासमोर प्रचंड आक्रोश केला. हा त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी) एअर बॅगही फुटली! हा भीषण अपघात काही नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिला असल्याचे समोर आले आहे. अपघात होण्यापूर्वी ही कार १२० ते १३० च्या स्पीडने होती. स्पीडमध्येच कार ट्रकच्या पाठीमागील बाजूस जोरदार आदळली. त्यामुळे एअर बॅग उघडली गेली. मात्र, ती फुटली असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. या अपघातात चालक बालंबाल बचावला.
उभ्या ट्रकला कारची धडक; दोघे सख्खे भाऊ ठार
By admin | Published: March 09, 2017 11:10 PM