सातारा : अवजड वाहनांचे ‘ब्रेक टेस्ट’ घेण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने चिंचणेर निंब येथील दहा एकर जागा निश्चित केली असून, येत्या काही दिवसांत शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी व्हेईकल टेस्ट घेतल्या जाणार आहेत. भविष्यात या ठिकाणी हे कार्यालय गेल्यास येथील ग्रामस्थ आणि युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील प्रत्येक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला स्वत:च्या जागेत व्हेईकल टेस्ट घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सातारा शहर परिसरात शासकीय जागा कोठे आहे, याची माहिती घेतली. न्यायालयाच्या निर्देशानुसार अडीचशे मीटर लांबीचा ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे एवढी मोठी जागा मिळणे तसे अवघड होते. मात्र, चिंचणेर (स) निंब येथील ८ हेक्टरपैकी चार हेक्टर जागा मिळावी, यासाठी आरटीओ कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला असून, त्यांनी या जागेला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही जागा आरटीओ कार्यालयाच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. साताऱ्यापासून चिंचणेर निंब हे केवळ १४ किलोमीटर आहे. त्यामुळे वाहनचालकांनाही सोयीचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)कशी घेतली जाते ब्रेक टेस्ट !ट्रक, बस, ट्रेलरयासह अन्य अवजड वाहनांची फिटनेस टेस्ट घेण्यासाठी कमीत कमी अडीचशे मीटर लांबीचा ब्रेक टेस्ट ट्रॅक हवा असतो. हा ट्रॅक पूर्णपणे डांबरीकरण केलेला असतो. जेणेकरून वाहनांची ब्रेक टेस्ट घेताना वाहने वेगात चालविली जातात. अचानक ब्रेक दाबून टेस्ट घेतली जाते. त्यानंतरचा संबंधित वाहनाला फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. सध्या लिंबखिंडजवळील महामार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर ही टेस्ट घेतली जात आहे. मात्र, सार्वजनिक रस्त्याचा वापर या टेस्टसाठी होऊ नये, असे न्यायालयाचे निर्देश असल्यामुळे आरटीओ कार्यालयानेही स्वत:ची जागा मिळण्यासाठी चंग बांधला आहे.
व्हेईकल टेस्ट आता चिंचणेर निंबला!
By admin | Published: December 29, 2016 12:20 AM