दत्ता यादव
सातारा : खासगी सावकारांच्या मानसिक छळाखाली दबलेल्या पीडितांनी आपल्यावर ओढावलेल्या अन्यायाला वाचा फोडली. जे पोलिसांना सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं. पण जे सांगायचं नव्हतं ते त्यांनी लोकमतला सांगितलं. हीच त्यांची करुण कहाणी लोकमतनं जशीच्या तशी त्यांच्याच शब्दात आपल्यासमोर आणलीय.
खासगी सावकारांकडून १० ते २० टक्क्यांनी ज्यांनी पैसे घेतले, त्यातील काही लोकांशी लोकमतने प्रत्यक्षात बोलून त्यांच्या व्यथा आणि पोलीस डायरीत नोंद न झालेली करुण कहाणी ऐकली. तेव्हा खासगी सावकारांनी छळांची परिसीमा कशी ओलांडली, याचं भीषण वास्तव पुढे येते.सातारा शहरात राहणाऱ्या दाम्पत्याकडून जेव्हा खासगी सावकाराकडून घेतलेले पैसे थकले तेव्हा त्या सावकारानं त्यांचा इतका मानसिक छळ केला की, त्यांच्या पै पाहुण्यांना फोन करून तुमच्या पाहुण्याला पैसे द्यायला सांगा, नाही तर बघून घेइन, अशी तंबीही दिली जात होती.पै पाहुण्यापर्यंत खासगी सावकाराने आपली इज्जत घालविल्याने, हे दाम्पत्य अक्षरश: जीव देण्याचा विचार करीत होतं. एवढेच नव्हे तर पत्नीचे अनैतिक संबंध आहेत, अशी अफवाही या खासगी सावकाराने त्यांच्या गावात उठविण्यास सुरुवात केली. तेव्हा नेमकं कसं जगावं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा होता. पण आता देवासारखे पोलीस आमच्या पाठीशी उभे राहिले, असे ते दाम्पत्य सांगतेय.एका खासगी सावकाराने तर छळांच्या परिसीमाची हद्दच ओलांडली होती. पैसे घेण्यासाठी एक दिवस खासगी सावकार एका व्यक्तीच्या घरी गेला होता. त्यावेळी घरात त्यांची महाविद्यालयात शिकणारी मुलगी होती. तिला पाहिल्यानंतर खासगी सावकाराने तिच्या वडिलांना तुम्ही पैसे देऊ नका, पण मुलीला एक दिवस माझ्याकडे पाठवा, असं बोलून त्यांचं मन दुखवलं. हे शब्द त्यांच्या कानावरून जातच नव्हते. सलग चार दिवस वडिलांनी अन्नाचा एकही कण पोटात घातला नाही. तब्येत बिघडू लागल्याने त्यांना दवाखान्यातही ॲडमिट करावं लागलं.सरतेशेवटी पत्नी, मुलगा आणि चुलत्यांनी त्यांना धीर देऊन संबंधित सावकाराच्या विरोधात तक्रार देण्यासाठी प्रवृत्त केलं. फलटण तालुक्यातही असंच काहीसं घडलं. व्याजाने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून चार दिवस दाम्पत्याला शेतात काम करायला लावलं. तर एका व्यक्तीला जमीन नावावर करण्यासाठी तगादा लावला. अशा एक ना एक मानसिक छळाच्या घटना पीडितांनी कथन केल्या.
महिन्यात १९ गुन्हे दाखल
तसं पाहिलं तर पूर्वी खासगी सावकाराची एखादा तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेला तर त्याची तक्रार तातडीने घेतली जाईल, याची शाश्वती नसायची. पण जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाटे यांनी खासगी सावकारांविरोधात कारवाइची मोहीम उघडल्यानंतर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. एका महिन्यात तब्बल १९ गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे अनेक कुटुंब आयुष्यातून उद्ध्वस्त होण्यापासून वाचली.