सातारा : प्रतापगडावरील शिवपराक्रमाला उजाळा देण्यासाठी श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी वंदनगडावर विजयोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. फेटेधारी मावळे, पारंपरिक वाद्यांचा गजर, गगणभेदी घोषणा, पालखी सोहळा अन् गुलालाच्या उधळणीत पार पडलेला हा सोहळा हजारो शिवभक्तांनी याची देही याची डोळा अनुभवला.३६४ वर्षांपूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला अफजल खान वधाचा प्रसंग इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविला गेला. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी शिवरायांनी क्षणाचाही उसंत न घेता चंदन-वंदन गडावर भगवा फडकवला आणि हिंदवी स्वराज्याचा ध्वज पन्हाळ्याच्या दिशेने दौडू लागला. या घटनेला उजाळा देण्यासाठी शिवप्रतापदिनाच्या दुसऱ्या दिवशी वाई तालुक्यातील वंदनगडावर श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने विजयोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचे यंदा पाचवे वर्ष आहे.बुधवारी सकाळी सात वाजता वाई तालुक्यातून आलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची तर कोरेगाव तालुक्यातून आलेली छत्रपती संभाजी महाराज यांची पालखी पारंपरिक वाद्याच्या गजरात वंदनगडाकडे मार्गस्थ झाली. वंदनगड पायथा, मरीआई देवी मंदिरामार्गे दोन्ही पालख्यांची सकाळी ११ वाजता भेटीचे पठार येथे भेट घडवून आणण्यात आली. पालखी गडावर मार्गस्थ करताना शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा गगणभेटी घोषणा देण्यात आल्या. तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी मिलिंद एकबोटे, विक्रम पावसकर, रविराज भोसले, संभाजी भालघरे यांच्यासह राज्यभरातील दहा हजारांहून अधिक शिवभक्तांनी हजेरी लावली.
शिवगर्जनांनी वंदनगड दुमदुमला!, हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा
By सचिन काकडे | Published: December 20, 2023 7:02 PM