कऱ्हाड : भाजपच्या मदतीनेच सत्यजित तांबेंना नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवता आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तांबेनी मानलेल्या आभारातच सगळे दडले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपात यावे असे वाटते. शेवटी निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. असे मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी व्यक्त केले.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील हे आज, शुक्रवारी कराड येथे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
थोरात खिंड सोडून पळून चाललेलेकाँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेस सोडतील का? तुम्हाला काय वाटते? याबाबत छेडले असता विखे-पाटील म्हणाले, खरं तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. पण मी जेव्हा भाजपमध्ये गेलो तेव्हा हेच बाळासाहेब थोरात मी एकटा इथली खिंड लढवून दाखवतो अशी भीमगर्जना करीत होते. पण आज तेच खिंड सोडून पळून चाललेले चित्र दिसते असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
अतुल भोसलेंना लागेल ती मदत करायला तयार डॉ. अतुल भोसले यांनी कराड तालुक्याचे नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना पक्ष पातळीवर जी मदत लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. असेही एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.