कोळकी - कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विडणी ग्रामपंचायतीने संपूर्ण विडणी गाव आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला नागरिकांचा व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विडणीत आत्तापर्यंत आठ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. महिन्यात गावात ६५ रुग्ण बाधित झाले आहेत तर २० जण ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामुळे पुढील धोका लक्षात घेऊन विडणी ग्रामपंचायतीने ग्रामस्थ व व्यावसायिकांची बैठक बोलावून व्यापाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करुन विडणी गाव आठवडाभर अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दोन दिवस अगोदर याबाबत लोकांना विडणी ग्रामपंचायतीने लाऊड स्पिकरव्दारे गाडीतून ग्रामस्थांना गाव बंद ठेवण्याबाबत सूचना करण्यात आली. तसेच बंद काळात दुकान उघडे ठेवल्यास १ हजार रुपये तर मास्क न वापरण्याला पाचशे रुपये दंड ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सरपंच रुपाली अभंग यांनी केले आहे. याला नागरिकांनी व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विडणी गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले.
चौकट
कोरोना लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी
विडणी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रॅपिड टेस्ट सुरु करण्यात आली असून, गावातील नागरिकांना थंडी, ताप, सर्दी, डोकेदुखी अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित टेस्ट करुन घ्यावी तसेच गावातील ४५ वयोगटावरील दोनशे लोकांना उपकेंद्रात लस देण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नयन शेंडे यांनी सांगितले.
फोटो - विडणी गावातील बंदला ग्रामस्थ व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (छाया-सतीश कर्वे).