महाबळेश्वर : ‘पुण्याचे विधान भवन येत्या तीन महिन्यांत सुरू करण्यात येणार असून, या विधान भवनाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल,’ असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
डाॅ. गोरे म्हणाल्या, ‘नागपूर येथील विधान भवन सुरू करण्यात आलेे आहे. पूर्वी तिथे हंगामी कामकाज पाहिले जात होते, आता मात्र ते बारामहिने सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे आता पुण्याचे विधान भवन सुरू करण्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनीही मान्यता दिली आहे, असे स्पष्ट करून डॉ. गोरे म्हणाल्या की, ‘महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून आता सावरतोय लसीकरणासही आता प्रारंभ झाला आहे. राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिक सक्षमपणे लक्ष देत आहेत. कोरोना काळात आरोग्य व्यवस्था सांभाळताना के्ंद्र व राज्य सरकार यांनी जनतेला योग्यप्रकारे धान्य पुरवठा केला, त्यामुळे उद्योगधंदे बंद असतानाही कोठे कोणाची उपासमार झाली नाही.’
एक मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाबाबत राज्याच्या ‘बिझिनेस ॲडव्हायजरी’ ची मुख्य बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार दोन्ही सदनांतील विरोधी पक्षनेते आघाडी सरकारमधील जे प्रमुख पक्ष आहेत, त्यांचे गटनेते हे उपस्थित असतील. बजेटच्या आनुषंगाने महत्त्वाचे प्रस्ताव या अधिवेशनात सादर केले जातील. एकंदरीत कामकाजाचे स्वरूप या बिझिनेस ॲडव्हायजरीच्या बैठकीत निश्चित होईल, अशी माहितीही डाॅ. नीलम गोरे यांनी यावेळी दिली.
चौकट..
महाबळेश्वरचा कायापलट होईल
राज्याच्या मोठ्या प्रश्नांबरोबरच स्थानिक पातळीवरील प्रश्नाकडेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तितकेच लक्ष देऊन सोडवित आहे, याचे उदाहरण म्हणजे महाबळेश्वर येथील वेण्णालेक व बाजारपेठेच्या सुशोभिकरणासाठी त्यांनी १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. सुशोभिकरणाचा आराखडाही तयार करण्यात आला असून एका वर्षात महाबळेश्वर शहराचा कायापालट झालेला सर्वांना दिसेल, असा विश्वासही डाॅ. गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला
डॉ. नीलम गोरे यांचा आयकार्ड फोटो वापरावा