वाई : मांढदरेव येथील श्री काळेश्वरी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याविषयी तयारीचा आढावा घेण्यासाठी मांढरदेवी येथील एमटीडीसी येथे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजित भोसले, भोरचे तहसीलदार सचिन पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, वाईचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.प्रशांत आवटे म्हणाले, ‘यावर्षी काळूबाई यात्रा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. गर्दीही मोठी असणार आहे. त्यामुळे नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या सर्वांनी व्यवस्थित पार पाडाव्या. सर्व विभागांनी समन्वयाने व सहकार्याने काम करावे. नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत ठेवावा. वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यात्रा स्थळाकडे येणारे रस्ते पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या.’यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रास्थळी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच भाविकांना सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था व एसटी बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे. खबरदारीचे उपाय म्हणून डोंगरावर जाळ रेषा काढण्यात आली आहे. तसेच अग्निशमन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने पूर्ण खबरदारी घेतली आहे.
मांढरदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश, यंदा मोठी गर्दी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 2:37 PM