कुडाळ : ‘गावचा विकास करायचा असेल तर गावातील कार्यरत ग्राम समित्यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रथमतः त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. त्या सक्षम असतील तर गावचा विकास निश्चितच होईल,’ असे मत राजसत्ता आंदोलनाच्या सातारा जिल्हा समन्वयक संगीता वेंदे यांनी व्यक्त केले.
जवळवाडी (ता. जावळी) येथे महिला राजसत्ता आंदोलनाच्यावतीने ग्राम समित्यांमधील सदस्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
सामाजिक अंतराचे निकष पाळून निवडक सरपंच व सदस्यांची ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला लक्ष्मीताई चिकणे, जवळवाडी सरपंच वर्षाताई जवळ, सदस्य गीता लोखंडे, सांगवी सरपंच भाग्यश्री पवार, दुंद सरपंच लक्ष्मी गोरे, प्रिया चिकणे, रोहिणी जाधव, लक्ष्मी वेंदे, संगीता सुतार, सरपंच विलास धनावडे, नंदा जाधव, राजश्री जवळ व विविध गावचे सरपंच व समित्यांचे सदस्य उपस्थित होते.
वेंदे म्हणाल्या, ‘ग्रामपंचायतीच्या कारभारात कार्यतत्पर ग्राम समित्या सक्षम व समृद्ध असतील तरच गावचा विकास शक्य आहे. याकरिता रेशन दक्षता, बाल हक्क संरक्षण, रोजगार दक्षता, ग्राम आरोग्य व पाणी पुरवठा-स्वच्छता, शाळा व्यवस्थापन अशा विविध समित्यांमधील सदस्यांनी आपली जबाबदारी ओळखून वेळ द्यायला हवा. ग्राम समितीतील सदस्यांनी यामध्ये सहभागी व्हावे तरच गावाचा विकास होईल.’