पाचवड : स्वत:च्या गावाला आदर्शग्रामङ्खम्हणवून घेणाऱ्या मोठ्या बाजारपेठेच्या गावांपासून ते अगदी लहान वाडीवस्त्यांमधील लोकांनी ‘एक गाव-एक गणपती’ योजनेकडे यावर्षीच्या गणेशोत्सवात पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. सर्वत्र अशी परिस्थिती असताना भुर्इंज, पाचवड व परिसरातील मोठ्या गावांच्या शेजारीच असणाऱ्या चांदवडी, भिवडी तसेच वेलंग यांसारख्या पुनर्वसित गावांनी मात्र ‘एक गाव-एक गणपती’ या योजनेचा मान ठेवत आपापल्या गावांमध्ये या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने चांदवडी या पुनर्वसित गावचा आदर्श भिवडी व वेलंग या गावांनी घेतल्याचे दिसून येत आहे. धोम धरणामध्ये जमिनी गेल्यानंतर सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी या गावांचे किसन वीर कारखान्याशेजारील माळावर पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन झाल्यापासून चांदवडी व इतर पुनर्वसित गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ योजना राबविली जात आहे. गावांमधील ग्रामस्थ व तरुणांमध्ये असलेल्या एकीचे प्रतीक म्हणजे या योजनेची दरवर्षी यशस्वीरीत्या होत असलेली अंमलबजावणी. शासनानेही चांदवडी गावाच्या या एकीची व कार्याची दखल घेऊन २००३ मध्ये त्यांना ‘एक गाव एक गणपती’ योजनेचा विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. गेल्या दशकामध्ये एकदाही निवडणुकीला सामोरे न जाणाऱ्या चांदवडी गावाला माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००६ मध्ये स्वत: निर्मलग्राम पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही मोठी बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये ग्रामस्थ व तरुणांकडून या योजनेकडे दुर्लक्ष होत असतानाच ४० वर्षांपासून ही पुनर्वसित गावे ‘एक गाव एक गणपती’ योजनेचा पाठपुरावा करून तरूणांना ही योजना यशस्वीरीत्या राबविण्यास प्रवृत्त करीत आहेत.चांदवडी गावच्या महिला सरपंच सारिका शिंंदे यांनी याबद्दल ग्रामस्थ व गावातील तरूणांचे कौतुक केले आहे. (वार्ताहर)चांदवडीत डॉल्बी कधी वाजलीच नव्हती... तरूणांना भुरळ पाडणारी डॉल्बी चांदवडीत मात्र गेल्या ४० वर्षांत कधीच वाजली नाही. युवकांना मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे व चांदवडीचा आदर्श पुढे ठेवत भिवडी व वेलंग या गावांनी सुध्दा डॉल्बीला आजपर्यंत जवळ केले नाही. युवकांवर कायमपणे डॉल्बीप्रेमाची मोहोर उमटवली जात होती. त्यामुळे या युवकांनी केलेल्या या सहकार्यामुळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.वृध्दांपासून ते तरूणांपर्यंत असलेल्या एकीमुळे चांदवडी गावामध्ये आजपर्यंत ‘एक गाव-एक गणपती’ ही योजना यशस्वीरीत्या राबविली जात आहे. मला चांदवडी गावाचा याबद्दल अभिमान असून गेल्या दशकामध्ये एकाही निवडणुकीला सामोरे न गेलेल्या गावाची अशीच अखंड वाटचाल ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देते. - सारिका शिंंदे, सरपंच, चांदवडी, ता.वाई
‘एक गाव-एक गणपती’चा पुनर्वसित गावांनी राखला मान
By admin | Published: September 29, 2015 10:00 PM