मसूर : ‘कोरोनाची भयानकता पाहून गावोगावी दोन दिवसात विलगीकरण कक्ष उभारण्यात यावेत. गृह अलगीकरण बंद करून सर्व बाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठवून कोरोनामुक्त गाव हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे,’ असे आवाहन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी केले.
मसूर व कोपर्डे हवेली गटातील मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व ग्रामसेवक व सरपंचांची कोरोना प्रादुर्भाव नियोजनासाठीची संयुक्त बैठक मसूर येथे घेण्यात आली. त्यावेळी दिघे बोलत होते.
या बैठकीला अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, मसूर पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक प्रवीण जाधव, मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाचे सदस्य निवास थोरात, सरपंच पंकज दीक्षित उपस्थित होते.
प्रांताधिकारी म्हणाले, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गृह अलगीकरण शासनाने बंद करून गावोगावी विलगीकरण कक्ष उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातील २५ टक्के रक्कम वापरता येणार आहे. आता ग्राम समित्यांवर मोठी जबाबदारी असून, ग्राम समित्यांनी प्रभावीपणे काम करत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी बाधित रुग्णाला विलगीकरण कक्षात पाठवावे. काही अडचण आल्यास पोलिसांची मदत घ्यावी. एखाद्या बाधित रुग्णाला अडचणींमुळे विलगीकरण कक्षात नेता येत नसेल, तर त्याठिकाणी मायक्रो कन्टेनमेंट झोन करण्यात यावा. विलगीकरण कक्षाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल.’
गटविकास अधिकारी पवार म्हणाले, कोरोनामुक्तीबरोबरच मृत्यूदर कमी आणणे गरजेचे आहे. विलगीकरण कक्षात कशाप्रकारे नियोजन व उपाययोजना कराव्यात, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी उपस्थित होते.
(चौकट)
समारंभ होऊ देऊ नका...
लग्नकार्यामुळे कोरोना फोफावत असल्याने लग्नाला परवानगी देताना सर्वांना कोरोना चाचणी अनिवार्य आहे. परवानगीशिवाय लग्न समारंभ होऊ देऊ नका, तसे लग्न झाल्यास कायदेशीर कारवाई करा व विवाह नोंद करू नका.
- अमरदीप वाकडे, तहसीलदार, कऱ्हाड
२८ मसूर
फोटो कॅप्शन : मसूर (ता. कऱ्हाड) येथील बैठकीत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, आदी उपस्थित होते.