सातारा : कोरोना महामारीचा चंचुप्रवेश होत असताना आपण सीमा बंद केल्या, लोकांना गाव बंदी घातली. बाधित रुग्ण रस्त्यावर फिरू नये, यासाठी दक्षता घेतली आता कशासाठी शांत राहिला आहात. कोरोनाग्रस्तांची संख्या रोज दोन हजारांच्या घरात आढळून येत आहे. आता कारभाऱ्यांना स्वस्थ बसून चालणार नाही, मोहिमेच्या सरदारांप्रमाणे त्यांना पुढे यावेच लागेल.
जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी हाहाकार माजवत आहे. अनेक लोक या महामारीमुळे त्रस्त झालेले आहेत, तसेच संसर्गदेखील वाढत असल्याने संसर्ग वाढू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आता स्वस्थ बसून चालणार नाही, परकीय आक्रमणाप्रमाणेच सूक्ष्मजीवांचे आक्रमण झालेले आहे, हे थोपविण्यासाठी लोकांमध्ये जागृती करणे हा एकमेव मार्ग आहे.
आपण आपल्या कर्तव्यात अजिबात कसूर करू नका. आपण प्रत्येकाने जर प्रामाणिक काम केले तरच आपली गावे कोरोनापासून वाचणार आहेत. ज्या गावात कोरोना समितीने दुर्लक्ष केले, त्या गावात रोज मृत्यूचे तांडव होत आहे. ही सत्य परिस्थिती आहे. आपल्या गावात वरून कोणीतरी येईल आणि लक्ष देईल हा विषय डोक्यातून काढून टाका. आपला गाव आपणच सांभाळला पाहिजे. त्यासाठी आपण लक्ष दिले आणि खालील बाबी गावात राबविण्यात आल्या तर ८ दिवसांत गाव कोरोनामुक्त होतेय, त्यासाठी प्रथम गाव ३ ते ४ दिवस पूर्ण बंद ठेवा. पूर्ण साखळी तुटते नंतर बाहेरून आलेल्या लोकांना विलगीकरण करा त्यांचा संपर्क होणार नाही, याची काळजी घ्या, गावात १०० टक्के मास्कचा वापरास सक्ती करा, त्यासाठी दंड वसूल करा. प्रत्येक व्यक्तीस सोशल डिस्टन्सचे पालन सक्तीचे करा, रोज स्पीकरवरून गावाला कोरोना किती भयंकर आहे, ह्याची जाणीव करून द्या, गावात मोठे कोणतेच कार्यक्रम होऊ देऊ नका, गावात रोज अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना सर्व्हे करण्यास सांगा, जे कोणी ताप, सर्दी, खोकला असेल त्यांना त्वरित प्राथमिक उपचार सुरू करा. ग्रामपंचायतीमधून आरोग्यासाठी असणाऱ्या निधीतून प्राथमिक औषधी खरेदी करा, गावात असणाऱ्या डॉक्टरांना प्राथमिक उपचार करण्यास मदत करण्याबाबत सूचित करा. दररोज गावच्या लोकांची माहिती घ्या. आता दुसरे कोणतेही काम करू नका. विकासकामे थांबली तरी चालतील; पण गावची माणसं वाचली पाहिजेत, हे लक्षात घ्या. आपण सरपंच गावच्या सर्व समस्यांचे तारणहार आहोत. हे विसरून चालणार नाही. आपण काम केले तरच आपले गाव वाचणार आहे. तुम्हाला ज्यांनी सरपंच केले, मानसन्मान मिळवून दिला, त्या जिवाभावाच्या लोकांच्या जीविताला प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपणास शासनाने काय दिले मग काम कसे करायचे ह्यात वेळ घालवू नका, हे सांगावे लागते. कारण परिस्थिती हाताबाहेर गेली तर कोणीही काहीच करू शकत नाही. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे त्यातच अनेक जण कोरोनाबाधित होऊनदेखील रस्त्यावर फिरत असल्याचे समोर येत आहे. घरात उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांची आरोग्याची स्थितीदेखील कळून येत असल्याने अगदी अंतिम क्षणी लोक ऑक्सिजनची गरज असताना धावाधाव करत असल्याचेही समोर येते, या परिस्थितीमध्ये गाव कारभाऱ्यांचे परिस्थितीवर नियंत्रण असणे अत्यावश्यक आहे.
कोट
मरगळ झटकून कामाला सुरुवात करा, नक्की गाव कोरोनामुक्त होतो, हे अनुभवातून सांगतो आहे. तरी काहीही करा; पण गड्या आपला गाव वाचवा.
- जितेंद्र भोसले, प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद, पुणे, महाराष्ट्र राज्य तथा लोकनियुक्त सरपंच, नागझरी