सातारा : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी राज्य शासनाने काही अटी शिथील केल्या आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातही ही योजना चांगल्या पध्दतीने राबविण्यासाठी नियोजन बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे पात्र महिलांना अर्जासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. गावागावातच समिती गठित केली असून आता घरी येऊन लाभाऱ्थीची नोंद केली जाणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डुडी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. या योजना नोंदणीसाठी आता ३१ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तसेच अर्जासाठी महिलांच्या शासकीय कार्यालयात रांगा लागत होत्या. पण, आता शासनाने अटी शिथील केल्या आहेत. त्यामुळे महिलांना अर्ज करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही.कारण, जिल्ह्यात ही योजना चांगल्या पध्दतीने राबविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी गावागावात समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गट अध्यक्षांचा समावेश आहे. सर्वांना कुटुंबांचे वाटप करुन लाभाऱ्थी महिलांची नोंद केली जाणार आहे. यासाठी गावांतही कॅम्प लावण्यात येतील. घरोघरी सेविका, मदतनीस जाऊन महिलांचा अर्ज भरला जाईल. त्याचबरोबर काही कागदपत्रे अपुरी असतील तर त्यासाठीही महिलांना सहकार्य करण्यात येईल. एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून दूर राहणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
भ्रष्टाचाराचा प्रकार झाल्यास बडतर्फ..जिल्ह्यात योजना राबविताना महिलांच्या तक्रारी येण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन झाले आहे का असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी योजनेच्या कामात कोणी शासकीय कर्मचाऱ्याने भ्रष्टाचार केला तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाईल असा इशारा दिला. तसेच जिल्ह्यात ८ लाख कुटुंबे आहेत. प्रत्येक ५० कुटुंबामागे एक टीम लाभाऱ्थी नोंदणीचे काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धबधब्याजवळ जाण्यास बंदी येणार !राज्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धबधबेही प्रवाहित झालेत. परिणामी मोठ्या संख्येने पर्यटक धबधब्याकडे वळत आहेत. अतिधाडसामुळे काहीजणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही पावसाळ्याच्या काळात धबधब्याजवळ जाण्यास बंदी करण्याबाबत विचार सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.