आॅनलाईन लोकमत
महाबळेश्वर, दि. १ : बंदी असतानाही तालुक्यात गोहत्या सुरू असल्याच्या निषेधार्थ तसेच धोंडिबा आखाडे यांच्या हल्लेखोरांना अटक करावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी महाबळेश्वरच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील ११० गावांमधील ग्रामस्थ तालुका बंद यशस्वी करून मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी रास्ता रोका रद्द करण्यात आला.
राज्यात गोहत्या बंदी असून, जनावरांचे कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत. तरीही येथे जंगलात गोहत्या केली जात आहे. याबाबतचे सर्व पुरावे पोलिसांना देण्यात आले आहेत. या संदर्भात योग्य तपास करून आरोपींना अटक करण्यात येईल, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील लोकांना होती. परंतु पोलिसांनी हे प्रकरण गांभीयार्ने घेतले नाही, तसेच देवळी येथील शेतकरी धोंडिबा आखाडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. धोंडिबा आखाडे यांचा नैसर्गिक मृत्यू नसून त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दोन्ही प्रकरणीही पोलिसांनी पंचनामे करणे व्यतिरिक्त कोणतीच कारवाई केली नाही, त्यामुळे संपुर्ण तालुक्यात पोलिसांच्या कारभाराविषयी असंतोष पसरला आहे.
ग्रामस्थांनी शुक्रवारी रास्ता रोको व तालुका बंदचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळी अकरा वाजता शिवाजी चौक ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारो आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. तहसील कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी अनेकांनी संतप्त भावना व्यक्त करत दोन्ही घटनांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली