पुसेगाव : कोरोनाकाळातील संचारबंदी काही जणांना रुचली नाही. वेळ कसा घालवावा, याच विवंचनेत वेळ कसा निघून गेला हेही लक्षात आले नाही. शहरातील सर्व बाजारपेठा बंद असल्याने वाड्यावस्त्यावरील, खेड्यातील नागरिकांचे मोठ्या गावाला येणे-जाणे बंद झाले. मात्र खटाव तालुक्यातील गादेवाडीत शेतकऱ्यांनी या काळाचा सदुपयोग करत शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता पिढ्यानपिढ्या अडचणींचा असलेला दीड किलोमीटर लांबीचा पाणंद रस्ता केवळ आठ दिवसांत श्रमदान करून तयार केला.
येथील घवळी नामक शिवारातील काळा कसदार पट्टा पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होता. येथील ग्रामस्थ अधिक दादासाहेब जाधव यांच्या घरापासून हनुमान मंदिरापर्यंतच्या परिसरात पावसाळ्यात प्रचंड चिखल नेहमीच होत असल्याने शेतात चिखल तुडवत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अनेकदा या रस्त्याची सोय शासनाच्या कोणत्या ना कोणत्या योजनेतून व्हावी म्हणून मागणी होत होती; पण कोणीही दखल घेतली नाही.
अखेर संकटालाच संधी मानत गावकऱ्यांनी कोरोनाकाळात लोकसहभागातून व श्रमदानातून हा रस्ता तयार करायचा एकमताने निश्चय केला. दीड किलोमीटरचा रस्ता एकमेकांच्या सहकार्याने एका आठवड्यातच पूर्ण झाला. पिढ्यानपिढ्या जवळपास सहा महिने हा परिसर चिखलमय असायचा. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेच नगदी पीक घेता येत नव्हते. शेतात पिकलेला माल सहा, सहा महिने बुछडे एका ठिकाणी लावून ठेवावे लागत होते. माल घरी येण्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबरची वाट पाहावी लागत असायची. कोणतेही भांडवली पीक त्या भागातील शेतकऱ्यांना घेता येत नव्हते. शिवाय शेतात जाण्यासाठी गुडघाभर चिखलातून मार्ग काढत जावा लागायचा. मात्र आता हे शिवारच रस्त्यावर आल्याचे मत येथील शेतकरी गणेश बोटे यांनी व्यक्त केले.
फोटो २९पुसेगाव-रोड
गादेवाडी येथील घवळी शिवारात ग्रामस्थांनी लोकसहभागातून व श्रमदानातून दीड किलोमीटरचा पाणंद रस्ता पूर्ण केला. (छाया : केशव जाधव)