आॅनलाईन लोकमतभुईंज (जि. सातारा) , दि. ३0 : भुईंज तालुका वाई याठिकाणी गावामध्ये अथवा परिसरामध्ये मटका आणि दारूधंदे कायम स्वरूपी बंद करण्याचा निर्धार भुईंज मधील अनेक युवा संघटनांनी आणि ग्रामस्थांनी घेतला आहे.अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या या धंद्यांना कायमचे बंद करण्याच्या या निधारार्ने या धंदेवाल्यांचे आणि त्यांच्याकडून हप्ते वसुलीखोरांचे धाबे दणाणले आहेत.भुईंज हे गाव वाई तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून पुणे बंगलोर महामार्गावर वसलेल्या या गावातील बहुतांश दारूची दुकाने शासनाच्या निर्णयामुळे बंद झाली आहेत. महामार्गशेजारील २५० मीटरच्या आतील सर्व दारू दुकाने बंद करण्याच्या निर्णयामुळे भुईंज मधील ६ बिअर बार आणि एक देशी विदेशी दारूचे दुकान बंद झाले. परंतु एक बिअर बार हे एकमेव बिअर बार चालू राहिले.आता बंद झालेल्या दारूच्या दुकान मालकांनी पुन्हा गावापासून लांब अशा वेगवेगळ्या ठिकाणी दारू दुकाने आणि बिअर बार उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.भुईंजमध्ये मटका सुद्धा राजरोसपणे सुरू असून आर्थिक लागेबांधे असल्याचे बोलले जात आहे. भुईंज मधील युवा प्रतिष्ठानने भुईंज परिसरातील मटका बंद करण्यासाठी अनेक वेळा पोलिसांना निवेदन देऊनही काहीच फरक पडत नाही, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. मटका बंद करण्यासाठी पाऊल उचलणाराला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळेच भुईंज युवा प्रतिष्ठान, सर्व युवा संघटना आणि ग्रामस्थांनी भुईंजमधील युवकांच्या जीवावर उठलेल्या आणि हजारो संसाराची होळी करणारा हा मटका धंदा बंद करण्याचा निर्धार केला आहे. भुईंज पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे.भुईंज मध्ये बंद झालेली दुकाने पुन्हा चालू करू न देता सध्या चालू असलेले दुकानही पूर्णपणे बंद करून भुईंज हे गाव सातारा जिल्ह्यातील आदर्श गाव बनवण्याचा निर्धार भुईंज मधील युवा पिढीने केला आहे. बंद झालेल्या दुकानांच्या पुनर्वसनासाठी भुईंज ग्रामपंचायतीने कसलीही परवानगी देऊ नये असे आवाहनही भुईंज मधील युवकांनी भुईंज ग्रामपंचायतीला केले आहे. या दारू आणि मटका बंदीच्या अभियानात सर्व पक्ष्याच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी,वरिष्ठ नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भुईंज मधील युवकांनी आणि विविध संघटना आणि ग्रामस्थानी केले आहे.
तर किंमत चुकवावी लागणार !
भुईंजमध्ये पुढील दोन महिन्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. जर आत्ता या मटका आणि दारू बंद अभियानात एखाद्या पक्षाने विरोध केला तर त्याची मोठी किंमत त्या पक्षाला आगामी ग्रामपंचयायीच्या निवडणुकीत चुकवावी लागणार असून दारात मते मागायला येणाऱ्या पुढाऱ्यांना त्यावेळी जाब विचारण्याचा निर्धारही भुईंज ग्रामस्थानी केला आहे.