नागठाणे : ‘ब्रेन ट्यूमर’चे निदान झालेला प्रथमेश आनंदराव कदम ऊर्फ शंभू सध्या पुण्यातील रुबी रुग्णालयात ‘ब्रेन ट्यूमर’चे उपचार घेत आहे. त्याच्या आयुष्यासाठी सारा गावच एकवटला आहे. शंभू सुखरूप बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करीत आहेत.
२० वर्षीय शंभू शेंद्रेतील काॅलेजमध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्याचे वडील हे वाहनचालक आहेत. शंभू गावातील विविध सामाजिक कार्यात सहभागी असायचा. मित्रमंडळीत त्याचा सातत्याने संपर्क असतो. गेल्या महिन्यात त्याच्या डोकेदुखीचे निमित्त झाले. त्यानंतर सातारा येथील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. डाॅक्टरांनी काळजीचे फारसे कारण नसल्याचे सांगितले. मात्र, तीन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याची डोकेदुखी उफाळून आली. साताऱ्यातील डाॅक्टरांनी त्याला पुण्याला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुण्यातील रुबी क्लिनिक रुग्णालयात तपासणी केली असता ‘ब्रेन ट्यूमर’चे निदान झाले. आठवडाभरात शस्त्रक्रिया न झाल्यास शंभूच्या जीवितास धोका असल्याचेही डाॅक्टरांनी नमूद केले. या शस्त्रक्रियेचा खर्च दहा लाखांच्या घरात आहे. ही रक्कम शंभूच्या वडिलांसाठी आवाक्याबाहेरची आहे. या पार्श्वभूमीवर सारे गावकरी, शंभूचे मित्र, नातेवाईक रक्कम उभी करण्यासाठी एकवटले आहेत. इतकेच काय गावातील माहेरवाशिणींनी त्यासाठी हातभार लावला आहे. मुंबईकर मंडळीही रक्कम गोळा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गावातील युवक मोठ्या संख्येने पोलीस क्षेत्रात कार्यरत आहेत. तेदेखील विविध माध्यमांतून मदत करताना दिसत आहेत. शंभू बरा व्हावा, सुखरूपपणे घरी यावा, यासाठी प्रार्थना करीत आहेत.
चोैकट:
खर्चाला हातभार लावण्याचे आवाहन
मदतीचे आवाहन
समाजातील दानशूर लोकांनी, तसेच सामाजिक संस्थांनी शंभूच्या शस्त्रक्रियेच्या खर्चाला हातभार लावावा, असे आवाहन ग्रामस्थ व मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.