चाफळपासून चार किलोमीटर अंतरावर नाणेगाव खुर्द गाव उत्तरमांड धरणाजवळ आहे. या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पवारवाडी वस्तीची शंभर ते सव्वाशेच्या घरात लोकसंख्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. गावानजीक उत्तरमांड नदीच्या पात्रात असलेल्या विहिरीतील पाण्याने सध्या तळ गाठला आहे. या विहिरीतील पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याले ग्रामस्थ खर्चासाठी या पाण्याचा वापर करत असतात. पिण्याच्या पाण्याचा दुसरा स्त्रोत्र नसल्याने लहान मुलांपासून वयोवृद्धांना पहाटे लवकर उठून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून जवळ असलेल्या खराडवाडी येथे त्या गावातील ग्रामस्थांचे नळ योजनेचे पाणी भरून झाल्यानंतर मग येथील ग्रामस्थांना पाणी शिल्लक राहिले तर मिळते. नाही तर मोकळ्या हाताने घरी भांडी घेऊन जावे लागत आहे.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शाळेतील बालकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी खराडवाडी ग्रामपंचायतीच्या नळ योजनेपासून पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. मात्र, पाणी पुरवठा कमी होत असल्याने खराडवाडी ग्रामपंचायतीने पाणी देण्यास विरोध केला आहे. शाळेतील मुलांना पाणी मिळू शकत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने या वस्तीला व शाळेतील मुलांना पाणी मिळवून देण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.