मुराद पटेल ल्ल शिरवळ आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल अर्थात आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर निवडणूक प्रचाराकरिता कमी कालावधी मिळू शकतो हे गृहीत धरून इच्छुक उमेदवारांनी सध्या पायांना भिंगरी बांधत राजकीय समीकरणे जुळवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये इच्छुकांनी मतदार संघातील गावांना भेटी देत ‘हम भी किसीसे कम नही’ असे दाखवत संपूर्ण परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी रणशिंग फुंकल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप यांच्यासह रिपब्लिकन पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी त्याचप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षानेही चाचपणी करत मैदानात उडी घेतल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता उमेदवार निवडताना राजकीय पक्षांना अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये प्रसंगी इच्छुक उमेदवारांनी राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना डावलले गेले तर अपक्ष म्हणूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. यामध्ये सर्वात जास्त चुरस ही शिरवळ गट व गण या खुल्या प्रवर्गाकरिता आरक्षित झालेल्या व खुल्या महिला प्रवर्गाकरिता आरक्षित झालेल्या भादे जिल्हा परिषद गटाकरिता तसेच खंडाळा पंचायत समितीच्या व नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षित झालेल्या नायगाव तसेच खुल्या प्रवर्गाकरिता आरक्षित झालेल्या पळशी गणामध्ये निर्माण झाली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, इच्छुकांची संख्या अधिक असल्याने याठिकाणी उमेदवारी मलाच मिळावी याकरिता अनेकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपापल्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडे उमेदवारीकरिता मागणी देखील केली आहे. यामुळे पक्ष प्रमुखांचीही उमेदवारी कोणाला द्यावी यावरून गोची झाली असून, कोणालाही शब्द न देता पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करावा लागेल, असा प्रेमळ दमही इच्छुकांना देताना दिसत आहे. त्यामुळे इच्छुकांनी प्रसंगी अपक्ष देखील लढण्याची तयारी ठेवत राजकीय गणिते जुळवण्यास सुरुवात देखील केली आहे. यामध्ये शिरवळ जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या अधिक झाली असून, प्रामुख्याने खंडाळा पंचायत समितीचे विद्यमान सभापती नितीन भरगुडे-पाटील व शिरवळचे उपसरपंच उदय कबुले यांच्यामध्ये उमेदवारीकरिता मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली असून, उमेदवारी शिरवळमध्ये द्यावी का पळशीमध्ये या विवंचनेत सध्या राष्ट्रवादीचे प्रमुख पडले आहे. याठिकाणी उमेदवार निवडताना आमदार मकरंद पाटील यांचा कस लागणार असून, अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, उमेदवारी नाकारली गेल्यास शिरवळ उपसरपंच उदय कबुले यांनी अपक्ष म्हणून निवडूक रिंगणात उतरण्याची तयारी करत त्यादृष्टीने मोर्चेबांधणी देखील सुरू करत बेरजेचे राजकारण देखील सुरू केले आहे. याकरिता पळशी पंचायत समिती गणातील भाजपचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत यादव यांच्या महिलांच्या तुळजापूर दर्शन मोहिमेमध्ये देखील उदय कबुले यांनी सहभाग नोंदवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.त्याचप्रमाणे शिरवळ पंचायत समिती गणाकरिता लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनी देखील जोरदार तयारी केली असून, शिरवळमधील जिल्हा परिषदेच्या उमेदवार निवडीवर त्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, प्रसंगी अपक्ष म्हणून देखील ते रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था अशी झाली असल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे ही उमेदवारीबाबतची संभ्रमावस्था लवकरात लवकर दूर करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान, शिरवळ पंचायत समिती गणामध्ये भाजपने देखील जोरदार तयारी चालवली असून, भाजप सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांनी देखील मोर्चेबांधणीला वेग आणला आहे. याठिकाणी भाजपचे जिल्हा परिषदेसाठी उमेदवाराचे नाव सध्या चर्चेत नसले तरी याठिकाणी आगामी शिरवळ गटातील राजकीय समीकरणावर उमेदवार निश्चित होईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे. तर शिवसेनेकडून ग्रामपंचायत सदस्य प्रदीप माने यांनी रणशिंग फुंकत जिल्हा परिषद गटामध्ये गाठीभेटींवर जोर दिला आहे. शिरवळ पंचायत समिती गणामध्ये तालुकाप्रमुख संजय देशमुख, उपतालुकाप्रमुख रमेश सोनावणे, मनोज देशमुख यांनीही जोरदार तयारी चालवली आहे. पळशी गणामध्ये शिवसेनेकरिता डोकेदुखी वाढली असून, याठिकाणी जिल्हा महिला संघटक शारदा जाधव, अंकुश ऊर्फ अप्पा महांगरे, शरद जाधव, पिलाजी जाधव, धर्मराज तळेकर, यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये अजय भोसले, संजय भोसले, विंगचे बंटी ऊर्फ प्रफुल्ल महांगरे, संकेत महांगरे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे पळशी गणातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या चर्चेला उधाण आले आहे. याठिकाणी भाजपचे चंद्रकांत यादव यांनी जोरदार तयारी करत पळशी गणातील संपूर्ण गावे पिंजून काढली असून, कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभारली आहे. शिरवळमधून फुटून नव्याने निर्माण झालेल्या नायगाव गणामध्ये ही राष्ट्रवादीकडून नायगावच्या माजी सरपंच राजेंद्र नेवसे यांना कडवे आवाहन देण्यासाठी धनगरवाडीचे माजी सरपंच मकरंद मोटे, शिरवळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विशाल परखंदे यांनी देखील जोरदार मोहीम राबवत शक्तिप्रदर्शन करत मोर्चेबांधणी केली आहे, प्रसंगी अपक्ष म्हणून देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी संबंधितांनी चालवली आहे. त्याचप्रमाणे भादे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीच्या माजी सभापती दीपाली साळुंखे यांच्या उमेदवारीला भादवडेच्या उज्ज्वला पवार यांनी आवाहन दिले असून, याठिकाणी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याठिकाणी शिवसेनेच्या वतीने रोहिणी साळुंखे व नुकताच काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेमध्ये डेरेदाखल झालेल्या धनाजी अहिरेकर यांच्या पत्नीचे कडवे आवाहन निर्माण झाले आहे. एकूणच खंडाळा तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ऐन थंडीमध्ये गरम झाले असून, राजकीय वातावरणामध्ये अनेक घडामोडींना वेग आला आहे.
गावोगावी इच्छुकांचा गाठीभेटींचा सपाटा..!
By admin | Published: January 03, 2017 11:27 PM