कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी-शिंदेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका परप्रांतीय युवकाने महिलेची छेडछाड केली तसेच संबंधित महिलेवर हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा युवक एका स्टोन क्रशरवरील कामगार असून, ग्रामस्थांमध्ये यामुळे संतापाचे वातावरण आहे. येथील सर्व क्रशर बंद करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पीडित महिला कोळेवाडी येथून शिंदेवाडीला जात असताना एका परप्रांतीय युवकाने तिची छेड काढली. यावेळी हा युवक नशेत होता. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, युवकाने महिलेच्या तोंडावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. तर दगडाने मारहाण केल्याने महिला जखमी झाली. शेतातून येत असलेल्या एका युवकाने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने त्याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्या हल्लेखोराने युवकाच्या अंगावर टाकण्यासाठी दगड उचलला. मात्र, अन्य ग्रामस्थांनीही त्याठिकाणी धाव घेतल्यामुळे हल्लेखोराने पलायन करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. याबाबत कोळे पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित जखमी महिलेवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोळेवाडी-शिंदेवाडी ग्रामपंचायत हद्दीत खिंडीमध्ये चार स्टोन क्रशर सुरू आहेत. या क्रशरवरून सतत अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. खाणीत सतत होत असलेल्या भुसुरूंगामुळे घरांना तडे गेले आहेत. तसेच क्रशरवर असलेल्या परप्रांतीय कामगांरामुळे महिलांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे खिंडीतील सर्व क्रशर बंद करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.